|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जनतेच्या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न

जनतेच्या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न 

पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन : स्ट्रीमकास्ट ग्रुपच्या डेटा सेंटरचे भूमिपूजन

वार्ताहर / बांदा:

 माझ्या जिल्हय़ातील जनतेने मला जे प्रेम दिले त्यातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा प्रकल्प आहे. एवढा मोठा प्रकल्प या भागात साकारत आहे, यापेक्षा मोठे भाग्य काय असू शकते? गेल्या अनेक वर्षात जनतेने मला भरपूर प्रेम दिले. त्या
प्रेमातून राजकीय शक्तीशी संघर्ष करून मी या स्थानापर्यंत येऊन पोहोचलोय. या भागाच्या निसर्गसंपन्नतेला हानी पोहोचविणारे कोणतेही प्रकल्प या भागात येणार नाहीत, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वाफोली येथे केले.

 एक प्रमुख खासगी आयपी क्लाऊड ऑपरेटर स्ट्रीमकास्ट ग्रुप क्लाऊड कॉम्प्युटिंग व्यवसायात स्ट्रीम क्लाऊडद्वारे सावंतवाडी-वाफोली येथे उच्च गणिती डेटा सेंटरच्या माध्यमातून पदार्पण करत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन दीपक केसरकर यांच्या वाढदिनी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, स्ट्रीमकास्ट ग्रुपचे चेअरमन निमित पंडय़ा, बांदा सरपंच मंदार कल्याणकर उपस्थित होते.

तंत्रज्ञानाचे दरवाजे उघडणार

 केसरकर म्हणाले की, आज आपल्या जिल्हय़ात कोणत्याही प्रकारचे मोठे व्यवसाय नसतांनाही हा जिल्हा उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहे. येथील साधन संपत्तीच्या आधारावर येथील युवकांनी निर्माण केलेल्या रोजगारामुळे हे शक्य झाले आहे. हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. निसर्गाच्या वैविधतेने नटलेल्या या जिल्हय़ात निसर्गाचा नायनाट करणारे प्रकल्प न आणता पर्यावरणाला पोषक प्रकल्प आणून या भागाचा विकास केला जाईल. तो विकास येथील नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित असेल. भविष्याच्या दृष्टीने आम्ही नव्या तंत्रज्ञानाचे दरवाजे उघडत आहोत. या नव्या क्षेत्रातून या जिल्हय़ाचे नाव जागतिक नकाशावर येणार आहे. डेटा सेंटरच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या तरुणांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विकासाच्या दृष्टीने प्रशिक्षित केले जाईल.

 यावेळी पल्लवी केसरकर, स्ट्रीमकास्ट ग्रुपचे प्रवक्ते मार्क अल्ड्रिज, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, अरुण दूधवडकर, अतुल पै, सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, प्रकाश परब, संजय पडते, अशोक दळवी, भैया गोवेकर, साई काणेकर, अशोक परब, राजेश विर्नोडकर, सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम, जिल्हा वनाधिकारी व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

   सूत्रसंचालन अभिनेते श्रेयस तळपदे यांनी केले. या कार्यक्रमात दीपक केसरकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Related posts: