|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आडाळीत साकारणार एफडीडीआयचे इन्स्टिटय़ूट

आडाळीत साकारणार एफडीडीआयचे इन्स्टिटय़ूट 

दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक : केंद्रीय समितीकडून पाहणी : एमआयडीसी प्रशासनाकडून 40 एकर जाग होणार वर्ग : स्थानिक बेराजगारांना प्रशिक्षण देऊन राजगाराची : देणार संधी – अरुण कुमार, व्यवस्थापकीय संचालक

प्रतिनिधी / दोडामार्ग:

आडाळी येथील एमआयडीसी क्षेत्रात दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक करून फुटवेअर डिझायनिंग ऍण्ड डेव्हलपमेंटने आपली इन्स्टिटय़ुट घालण्यास हिरवा कंदील दिला आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारी चाळीस एकर जागा एफ.डी.डी.आय.कडे एमआयडीसी प्रशासनाने वर्ग करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास आडाळीत साकारणारी एफ.डी.डी.आय.ची महाराष्ट्र राज्यातील ही पहिलीच इन्स्टिटय़ुट ठरणार आहे. बुधवारी आडाळीतील एमआयडीसी क्षेत्राची पाहणी केल्यावर एफ.डी.डी.आय.चे व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार यांनी इन्स्टिटय़ुटला हिरवा कंदील दर्शविला.

 आडाळी येथे एमआयडीसी होऊन तालुक्यातील बेरोजगार युवक-युवतेंना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एमआयडीसी मंजूर केली. त्याकरिता शेतकऱयांच्या जमिनी संपादीत करून त्यांना योग्य तो मोबदला देण्यात आला. या प्रक्रियेत जि. प. चे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी सिंहाचा वाटा उचलला. मात्र, त्यानंतर चार वर्षाच्या काळात एमआयडीसीचे पुढील काम रखडले. त्यामुळे रखडलेल्या आडाळी एमआयडीसीला पुन्हा उर्जितावस्था मिळावी, यासाठी माजी आमदार राजन तेली, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पं. स. सदस्य बाळा नाईक आदींनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांचे याकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी त्यांनी आडाळी एम.आय.डी.सी. ला चालना देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आदेशानुसारच बुधवारी केंद्रीय समितीने आडाळी येथे येऊन एमआयडीसीच्या जागेची पाहणी केली. यावेळी या समितीत एफ.डी.डी.आय.चे व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार, कार्यकारी संचालक विजय सिंग, रत्नागिरी येथील एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता परशुराम करावडे, प्रादेशिक अधिकारी एस. आर. बर्गे, कुडाळ एमआयडीसीचे अधिकारी अविनाश रेवणकर, इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ पॅकेजिंग सेंटरचे सहसंचालक अमित सिंग यांचा समावेश होता. या सर्वांनी आडाळी एमआयडीसीच्या जागेची पाहणी केली. बुधवारी सकाळी 10 वा. च्या दरम्यान ही समिती आडाळीत दाखल झाली. यावेळी आडाळी सरपंच उल्का गावकर, जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पं. स. सदस्य बाळा नाईक, माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, आडाळी ग्रा. पं. सदस्य पराग गावकर, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, माजी सरपंच संजना गावकर, लुपीन फाउंडेशनचे योगेश प्रभू आदींनी ग्रा. पं. च्यावतीने स्वागत केली.

आडाळी एम.आय.डी.सी.ची पाहणी केल्यावर एफ.डी.डी.आय.चे व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार यांनी दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक करून एफ.डी.डी.आय.ची इन्स्टिटय़ुट साकारण्यास सहमती दर्शविली. याठिकाणी 12 वी व पदवीधर असलेल्या युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांचा कौशल्यविकास साधला जाणार आहे. यातून पुढे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मात्र, त्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने 40 एकर जागा वर्ग करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास ही इन्स्टिटय़ुट महाराष्ट्रात प्रथमच निर्माण होईल तर देशातील या इन्स्टिटय़ुटची संख्या 13 वर पोहोचेल, अशी माहिती श्री. कुमार यांनी दिली.

इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ पॅकेजिंग सेंटरही अनुकूल

आडाळी येथे एमआयडीसी क्षेत्राची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीत इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ पॅकेजिंग सेंटरचे सहसंचालक अमित सिंगला यांचा समावेश होता. त्यांनीही एमआयडीसीची पाहणी केल्यावर पॅकेजिंग सेंटर उभारण्यास अनुकूलता दर्शविली. साधारणतः 100 कोटींची गुंतवणूक करण्यास त्यांनी सहमती दर्शविली.

दिल्लीतील भेटीने एमआयडीसीला गती?

आडाळी येथे एमआयडीसीसाठी जागा संपादन करून चार वर्षे झाली तरी प्रत्यक्षात पुढील प्रक्रिया होत नसल्याने आडाळीचा एमआयडीसी प्रकल्प रखडला होता. त्याला पुन्हा चालना मिळावी, यासाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तेली यांच्या नेतृत्वाखाली जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर व पदाधिकाऱयांनी केंद्रीय समितीने आडाळीत येऊन गुंतवणूक करण्यास समर्थता दर्शविली. त्यामुळे आडाळी एमआयडीसीला उर्जितावस्था मिळण्यास गती मिळाली आहे.

औद्योगिक विकास महामंडळाची भूमिका महत्त्वाची

एफ.डी.डी.आय. व इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ पॅकेजिंग सेंटरने आडाळीत आपापली इन्स्टिटय़ुट घालण्यास समर्थता दर्शविली असली तरी आता खरी भूमिका महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाची राहणार आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱयांनी त्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. मात्र, यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी माहिती यावेळी एफ.डी.डी.आय.चे व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार यांनी दिली.