|Monday, October 15, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आनंदाचे बन

आनंदाचे बन 

आटपाट नगरच्या मंत्रिमंडळाची बैठक चालू होती. त्यातली बाहेर ऐकू आलेली काही वाक्मये –

“पृथ्वीवर वेगवेगळय़ा देशातले लोक किती आनंदी आहेत हे मोजायची पद्धत सुरू झाली आहे. त्यावरून त्या देशांना क्रमांक दिले जातात. आपल्या देशाचा क्रमांक पहिला यावा असं सगळय़ांना वाटतं.’’ “काही देशांनी वरचा क्रमांक पटकवण्यासाठी आपण आनंद निर्माण करणारं एक खातं तयार केलं आहे.’’

“खातं निर्माण करायची काय गरज होती? त्याऐवजी प्रत्येक जिह्यात एकेक आनंद महामंडळ निर्माण करता आलं असतं. भरपूर कार्यकर्त्यांची चरायची सोय झाली असती.’’

“खरं म्हणजे या कशाचीही गरज नव्हती. त्यांच्याकडे अनेक नेते रोज काहीतरी आचरट विधानं करीत असतात. त्यातून जनतेला टाईमपासचा, विरोधकांना टीकेचा आणि टीव्ही-वर्तमानपत्रांना टीआरपीचा आनंद मिळत असतोच की. गेल्या सत्तर हजार वर्षात सरकारने लोकांना असा आनंद दिला नसेल.’’   “आपण देखील असं काहीतरी करायला पाहिजे.’’

“पण लोकांना आनंद द्यायचा म्हणजे नक्की काय द्यायचं? काही लोकांना स्वतः परंपरा जपण्यात आणि इतरांच्या धर्मात सुधारणा होण्यात आनंद असतो. काही लोकांना रात्रंदिवस ध्वनिवर्धक लावून डीजेच्या तालावर नाचण्यात आणि काही लोकांना शांतपणे जगण्यात आनंद वाटतो. बायको माहेरी जाण्यात नवऱयाला आणि गटारीच्या पहाटे नवरा लवकर परत येण्यात बायकोला आनंद वाटू शकतो. कौटुंबिक सिरियलच्या बाबतीत नवरा आणि बायकोचे आनंद परस्परविरोधी गोष्टीत अडकलेले असतात. वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांचे देखील आनंद एकमेकांच्या विरुद्ध असतात.’’

“आपण आयडिया करू. आनंदाची शिधापत्रिका काढू. शालांत परीक्षेनंतर महाविद्यालयीन प्रवेशासाठी शिक्षणमंडळ अर्ज भरून घेते, तसे नागरिकांकडून फॉर्म भरून घ्यायचे. नागरिकांनी त्यात प्राधान्यक्रमानुसार आनंद वाटणाऱया गोष्टी लिहून द्यायच्या. सरकार त्यांना त्यातली उपलब्ध गोष्ट देण्याचा प्रयत्न करील. ती गोष्ट नागरिकांना स्वीकारावी लागेल. जवळच्या कार्यकर्त्यांना आपण मॅनेजमेंट कोटय़ातून आनंददायी वस्तूंचे वाटप करू.’’

“मी काय म्हणतो, आपल्या मित्रपक्षाचे नेते युती मोडत नाहीत, सत्तेत राहतात. शिवाय रोज आपल्यावर टीका करीत असतात. आपण पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात हे भानगडीचं खातं गोड बोलून त्यांच्या गळय़ात मारलं तर? त्यांचं ते बघून घेतील.’’

“ही आयडिया बेस्ट आहे.’’

Related posts: