|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सावधान! कशेडी घाट खचतोय..!

सावधान! कशेडी घाट खचतोय..! 

धामणदिली हद्दीत रस्ता खचला

वाहनचालकांचा जीव मुठीत,

प्रशासनाच्या बेफिकीरी कायम

घाटाची सुरक्षितता रामभरोसे

राजू चव्हाण /खेड

जिल्हय़ाचे मुख्य प्रवेशद्वार असलेला कशेडी घाट सध्या ‘डेंजरझोन’मध्ये आहे. मुसळधार पावसामुळे धामणदिवी हद्दीतील रस्ता खचला असून महामार्गावरून धावणाऱया वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. वाहने हाकताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यापलिकडे प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना होत नसल्याने घाटाची सुरक्षितता ‘रामभरोसे’ आहे.

रत्नागिरी व रायगड हे दोन्ही जिल्हे कशेडी घाटमाथ्यावर एकत्र येतात. हा घाट खेड तालुक्याचे मुख्य प्रवेशद्वार असून महामार्गावरून हजारो वाहनांची दिवस-रात्र रहदारी सुरू असते. मात्र तरीही कशेडी घाट पूर्णपणे सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना आखल्या जात नसल्याने वाहनचालकांवर डोक्यावर धोक्याची टांगती तलवार आहे. अतिवृष्टीदरम्यानच तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजनांसाठी जागे होणाऱया राष्ट्रीय महामार्ग खात्याला पूर्णपणे जाग कधी येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ऑगस्ट 2016मध्ये कशेडी घाटापासूनच काही अंतरावर असलेल्या भोगावनजीक तब्बल 72 मीटरपर्यंतचा रस्ताच पूर्णतः खचला होता. याचीच पुनरावृत्ती धामणदिवीनजीक झाली आहे. एकीकडे महामार्ग पुरता खड्डय़ात गेल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढलेली असतानाच त्यात आता धामणदिवीनजीक खचलेल्या मार्गाची भर पडल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे खचलेल्या रस्त्याची अवस्था बिकट बनत चालली आहे.

ब्लास्टींगचा परिणाम?

खचणाऱया रस्त्यावर उपाययोजना करण्याच्या नादात ब्लास्टिंग करण्यात आले आहे. यामुळे मातीचा थर अलग होवून पावसामुळे रस्ता दिवसेंदिवस तडे जावून खचत चालला आहे. प्रशासनाकडून केवळ वाहनचालकांना वाहने हाकताना खबरदारी घेण्याचे सूचित पेले आहे. मात्र खचलेल्या रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यास प्रशासनाला अजूनही सवड मिळालेली नाही. यामुळे रस्ता खचून महामार्ग ठप्प झाल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

सुरक्षा दगडी भिंतीवर

लाखोंचा निधी खर्चून देखील कशेडी घाट असुरक्षित असून कशेडी घाटात दरेकरवाडी मैल दगड नं. 158, आंबा स्टॉप मैल दगड नं. 160, आपेडे मैल दगड नं. 174/4 ही अपघात प्रवण क्षेत्रे आहेत. विशेषतः येथे सातत्याने दरडी कोसळत असूनही उपाययोजनांअभावी हा भाग ‘डेंजरझोन’मध्ये आहे. सद्यस्थितीत घाटातील धोकादायक ठिकाणी केवळ दगड रचून संरक्षित भिंती उभारण्यात आल्या आहेत. मात्र या संरक्षक भिंतींमुळे सुरक्षिततेची हमी कोणीच देवू शकत नाही.

Related posts: