|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव

केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव 

शुक्रवारी लोकसभेत चर्चा, भाजपला बहुमताचा विश्वास, विरोधकही सज्ज

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

साडेचार वर्षे केंद्रात सत्तेत असणाऱया भाजप-रालोआ सरकारविरोधात विरोधी पक्षांच्या वतीने अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी तो स्वीकारला असून त्यावर येत्या शुक्रवारी, चर्चा होणार आहे. तेलगु देशभ पक्षाने मांडलेल्या या प्रस्तावाला काँगेससह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. 2003 नंतरचा हा केंद्र सरकारविरोधातील पहिलाच अविश्वास प्रस्ताव आहे.

सत्ताधाऱयांना या प्रस्तावास सामोरे जाण्याची पूर्ण तयारी केली असून बहुमत सिद्धतेचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना आदेश दिला असून शुक्रवारी संसदेत उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. काँगेस व इतर समर्थक विरोधी पक्षांनीही त्यांच्या खासदारांना व्हिप जारी केला आहे.

तेलगु देशमचे खासदार केसीनेनी श्रीनिवास यांनी प्रस्ताव लोकसभेत सादर केला. पुरेशा खासदारांनी त्याचे समर्थन केल्याने सभाध्यक्ष महाजन यांनी तो त्वरित स्वीकारला आणि शुक्रवारी चर्चा व मतदानाचा कार्यक्रम घोषित केला. काँगेस तेलगु देशमने चर्चा पुढे ढकलण्याची मागणी केली. तथापि, ती फेटाळण्यात आली. शुक्रवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा कालावधी चर्चेसाठी देण्यात आला आहे. त्यानंतर मतदान होणार आहे.

संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनातही तेलगु देशमने असा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला होता. तथापि तो त्यावेळी लोकसभाध्यक्षांनी असंमत केला होता. मात्र यावेळी त्यांनी तो स्वीकारला असून त्याकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे.

आमच्याकडे संख्याबळ

अविश्वास प्रस्ताव संमत करण्याइतके संख्याबळ आमच्याकडे आहे, असा विश्वास काँगेस नेत्या सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आमची ताकद लोकसभेत मतदानाच्या वेळी दिसेल. संख्येची खात्री असल्यानेच अविश्वास प्रस्ताव मांडला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रस्तावाचे भवितव्य काय ?

काँगेस नेत्या गांधी यांनी खात्री व्यक्त केली असली तरी सध्याच्या स्थितीत भाजप आणि रालोआचे पारडे जड आहे. एकटय़ा भाजपकडेही बहुमत आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव फेटाळला जाणार याची जवळपास खात्री आहे. काही अघटित घडल्यासच वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे. काँगेस व विरोधी पक्षांना सरकार पाडविण्यापेक्षा आपली आणि रालोआची एकत्रितता पडताळून पहायची आहे. त्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे, असेही मत जाणकारांनी व्यक्त केले.

संसद अधिवेशनाचा गदारोळात प्रारंभ

बुधवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला. लोकसभेत आणि राज्यसभेत 11 वाजता प्रश्नोत्तर तास पार पडला. नंतर काही विषयांवर चर्चा ही करण्यात आली. चार नवी विधेयके राज्यसभेत सादर करण्यात आली. पोस्ट कार्यालयातून पारपत्र देण्याची योजना सुरू करण्यात आली असून देशभरात 215 पोस्ट कार्यालयांमध्ये आता ही सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत दिली. देशात सध्या 21 अणुभट्टय़ा निर्माण केल्या जात आहेत, अशीही माहिती देण्यात आली. त्या कार्यरत झाल्यानंतर एकंदर 15 हजार 700 मेगावॅट ऊर्जेची भर पडणार आहे. सध्या 9 अणुभट्टय़ा निर्मितीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत, अशीही माहिती देण्यात आली.