|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला हॉकी संघाची सलामी इंग्लंडशी

भारतीय महिला हॉकी संघाची सलामी इंग्लंडशी 

नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2018 च्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेला इंग्लंडमध्ये 21 जुलैपासून प्रारंभ होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताची सलामीची लढत यजमान इंग्लंडशी होणार आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे सोपविण्यात आले असून सोएर्द मारिने हे या संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. भारतीय महिला हॉकी संघाला आजपर्यंत या स्पर्धेत पदक मिळविता आलेले नाही. यावेळी भारतीय महिला संघाने सरावावर अधिक भर दिला असून जोरदार तयारी केली आहे. भारतीय संघ या स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करेल. भारतीय संघामध्ये अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचे मिश्रण असून हा संघ समतोल असल्याचे प्रशिक्षकांनी म्हटले आहे. यापूर्वी भारतीय संघाने अनुभवासाठी स्पेनचा दौरा केला तसेच भारत आणि नंतर इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची हॉकी कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरी राहिले.

जागतिक महिला हॉकी संघाच्या मानांकनात द्वितीय स्थानावरील यजमान इंग्लंडचा ब गटात समावेश आहे. या गटात सातव्या मानांकित अमेरिका, दहाव्या मानांकित भारत आणि 16 व्या मानांकित आयर्लंडचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघांचा सहभाग असून ते चार गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचा संघ उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश करेल तर प्रत्येक गटातील दुसऱया आणि तिसऱया संघामध्ये उपांत्यपूर्व फेरीसाठी चुरस राहील. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, चीन, जर्मनी, इटली, जपान, कोरिया, हॉलंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, स्पेन यांचा समावेश आहे.

1974 साली झालेल्या महिलांच्या पहिल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताने चौथे स्थान मिळविले होते. कास्यपदकाच्या लढतीत त्यावेळी पश्चिम जर्मनीने भारताचा 2-0 असा पराभव केला होता. 2018 च्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघातील 16 खेळाडू प्रथमच या स्पर्धेत भाग घेत आहेत. कर्णधार राणी रामपाल आणि दीपिका या संघातील ज्येष्ठ खेळाडू आहेत. विद्यमान विजेत्या हॉलंडने या स्पर्धेत आतापर्यंत सातवेळा अजिंक्यपद मिळवित आपले वर्चस्व राखले आहे. सदर स्पर्धा 21 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान लंडनमध्ये खेळविली जाईल.

गट अ- चीन, इटली, कोरिया, हॉलंड, गट ब- इंग्लंड, भारत, आयर्लंड, अमेरिका, गट क- अर्जेंटिना, जर्मनी, द.आफ्रिका, स्पेन, गट ड- ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जपान, न्यूझीलंड.

भारताचे सामने- 21 जुलै- वि. इंग्लंड सायंकाळी 6.30 वाजता, 26 जुलै- वि. आयर्लंड सायंकाळी 6.30, 29 जुलै- वि. अमेरिका रात्री 9.30 वाजता.

Related posts: