|Saturday, March 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 70 वर्षांनी इस्रायल ज्यू राष्ट्र घोषित

70 वर्षांनी इस्रायल ज्यू राष्ट्र घोषित 

जेरूसलेम  / वृत्तसंस्था :

इस्रायलची संसद नेसेटने गुरुवारी वादग्रस्त ‘ज्यूज नेशल बिल’ला कायदेशीर दर्जा दिला आहे. या विधेयकानुसार इस्रायल आता ज्यू राष्ट्र ठरले आहे. याचबरोबर अरबी भाषेला देण्यात आलेला देशाच्या अधिकृत भाषेचा दर्जा देखील मागे घेण्यात आला. अविभाज्य जेरूसलेम इस्रायलची राजधानी असेल असे या विधेयकात नमूद आहे. देशहितासाठी संसदेत हे विधेयक संमत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इस्रायलची स्थापना 1948 मध्ये ज्यूंची भूमी म्हणूनच करण्यात आली हाती. तेव्हा जगभरातून ज्यूंना पॅलेस्टाईन येथे परतून स्वतःच्या भूमीवर हक्क दर्शविण्याचे आवाहन करण्यात आले होते.

इस्रायलच्या अरब खासदारांनी संमत झालेल्या नव्या विधेयकाला विरोध केला आहे. तर पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांना याला ऐतिहासिक क्षण ठरविले. नेतान्याहू यांचे सरकार कडव्या विचारसरणीचे मानले जाते. इस्रायल ऐतिहासिकदृष्टय़ा ज्यू लोकांचे निवासस्थान असून केवळ त्यांनाच येथे राष्ट्रीयत्वाचा हक्क मिळावा असे या विधेयकात नमूद आहे. संसदेत विधेयकाला संमती मिळण्यास 8 तासांचा कालावधी लागला. विधेयकाच्या बाजूने 62 तर विरोधात 55 खासदारांनी मतदान केले आहे.

18 लाख अरबांचे वास्तव्य

इस्रायलच्या 90 लाखांच्या लोकसंख्येत 20 टक्के (18 लाख) अरब (मुस्लीम) आहेत. इस्रायलच्या कायद्यानुसार अरबांना देखील तेथे ज्यूंप्रमाणेच अधिकार देण्यात आले आहेत. परंतु ते दीर्घकाळापासून दुय्यम नागरिकाची वागणूक तसेच भेदभाव होत असल्याची तक्रार करत राहिले आहेत. विधेयक संमत होताना पाहून देशात लोकशाहीची हत्या करण्यात आल्याचे वाटत असल्याचे अरब खासदार अहमद तीबी यांनी म्हटले.

नवा कायदा धोरणांद्वारे एका वंशाचा स्वतःला शेष्ठ ठरविण्याचा प्रयत्न असल्याचा दावा अरब अधिकारांसाठी संघर्ष करणारी स्वयंसेवी संस्था अदलाहने केला आहे. मागील आठवडय़ात नेतान्याहू यांनी आम्ही इस्रायलच्या लोकशाहीत नागरिकांचे अधिकार कायम ठेवू, परंतु बहुमताजवळ अधिकार असतो आणि याचा निर्णय देखील बहुमताच्या आधारावरच होईल असे म्हटले होते.

जेरूसलेमला राजधानीचा दर्जा

डिसेंबर महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारून लावत जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती. याचबरोबर त्यांनी अमेरिकेचा तेल अवीवमधील दूतावास जेरूसलेम येथे हलविला आहे. अमेरिका नेहमीच जगात शांततेच्या बाजूने राहिले असून यापुढे देखील राहिल. सीमा वादात आमची कोणतीही भूमिका नसेल असे ट्रम्प म्हणाले होते. 1948 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रमन हे इस्रायलला मान्यता देणारे पहिले जागतिक नेते ठरले होते.

Related posts: