|Sunday, February 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » स्त्री-पुरुष समानता

स्त्री-पुरुष समानता 

केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्यासंबंधीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. गेली कित्येक वर्षे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून त्यासंदर्भात बरेच उलटसुलट युक्तीवाद केले जात आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या काळात एखाद्या धार्मिक स्थळी महिलांना प्रवेश बंदी करणे अयोग्य असून अशा प्रथा बंद झाल्या पाहिजेत. अशा प्रथा घटनाबाहय़ असून त्यांच्यामुळे महिलांचा अवमान होतो, अशी बाजू मांडण्यात येते. तर हा मुद्दा समानतेचा नसून विशिष्ट स्थानी शेकडो वर्षे चालत आलेल्या परंपरेचा आहे. या परंपरांचे पालन करण्याच्या कृतीला कायद्याचे आणि घटनेचे संरक्षण आहे. शबरीमला या प्रश्नाकडे समानतेच्या आधुनिक विचारसरणीच्या दृष्टीकोनातून न पाहता अनादि काळापासून चालत आलेल्या परंपरांच्या अनुषंगाने त्यांचा विचार केला जावा, असा युक्तीवाद दुसऱया बाजूने करण्यात येतो. शबरीमला हे मंदिर अय्यप्पास्वामी यांचे असून मंदिरातील मुख्य मूर्ती ‘शष्ठ’ म्हणून ओळखली जाते. अशी अनेक मंदिरे केरळमध्ये किंवा इतरत्रही आहेत. तेथे महिलांना प्रवेशबंदी नाही. ती केवळ शबरीमला या स्थानीच आहे. आता या सर्व मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालय जो निकाल द्यायचा तो देईलच. पण या निमित्ताने ही परंपरा नेमकी काय आहे आणि ती केव्हापासून आहे याची थोडक्यात माहिती घेऊन हा वादही का आणि कसा निर्माण झाला हे समजून घेणे आवश्यक आहे. एका कथेप्रमाणे अय्यप्पास्वामी हे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व असून ते केरळमधील पथ्थनामथिट्टा या प्रदेशातील पंथालम नामक छोटय़ा राज्याचे राजपुत्र होते. निरपराध्यांना त्रास देणाऱया एका राक्षशीणीचा नाश करण्यासाठी अय्यप्पा यांचा जन्म झाला होता, अशी कथा पुराणात आहे. ही राक्षशीण मूळची एक स्त्री असून शापामुळे तिला तशा प्रकारे वावरावे लागत असे. अय्यप्पा यांनी तिचा वध केल्यानंतर तिची शापातून मुक्तता झाली आणि तिला तिचे मूळचे सुंदर स्वरूप प्राप्त झाले. तिने अय्यप्पाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांनी नकार दिला आणि सांगितले की आपले ध्येय पूर्ण झाले असून आता आपल्याला भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी शबरीमला येथे परत गेले पाहिजे. या नकारामुळे तिला वाईट वाटले. तिची नाराजी दूर करण्यासाठी अय्यप्पा यांनी तिला शब्द दिला की भक्त आपल्या दर्शनाला येण्याचे थांबवतील तेव्हा मी तुझ्याशी विवाह करेन. कथा पुढे असे सांगते की ती स्त्री आजवर शबरीमलापासून जवळच असणाऱया एका मंदिरात वाट पहात आहे. तिची मूर्ती मलिकापुरथम्मा या नावाने असून तिची पूजा केली जाते. याच कारणामुळे तिला सहानुभूती दर्शविण्यासाठी तसेच तिच्या प्रदीर्घ प्रतीक्षेचा मान राखण्यासाठी तरुण महिला शबरीमलाच्या अय्यप्पा मंदिरात जात नाहीत. तसेच अय्यप्पा हे बालब्रम्हचारी असल्याने त्यांचा साधनाभंग होऊ नये म्हणूनही तेथे तरुण महिला जात नाहीत. याचाच अर्थ असा की महिलांनी तेथे जाऊ नये अशी धर्माज्ञा नसून हा विश्वासाचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे. न्यायालयाने या स्थानी महिलांना प्रवेश दिला तरी या कथेवर विश्वास ठेवणाऱया महिला तेथे जाणार नाहीत, असे अनेकांचे मत आहे. ज्यांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेला आहे, त्यांनी ही कथा आणि त्यातून निर्माण झालेली परंपरा यातील भाव लक्षात घेतलेला नाही, असेही मत व्यक्त केले जाते. ही कथा बरीच मोठी आहे आणि तिचा संबंध हिंदू धर्मातील शैव आणि वैष्णव पंथियांच्या एकात्मतेशीही आहे. या कथेचा केवळ संबंधित भाग येथे दिला आहे. शैव आणि वैष्णव यांच्यात एकेकाळी प्रचंड संघर्ष होता. तो कालांतराने सामोपचाराने मिटविण्यात आला. अय्यपांचा जन्म हा शैव आणि वैष्णव यांच्या एकात्मतेतून झाला असेही मानण्यात येते.  केरळ उच्च न्यायालयाने 1991 मध्ये या परंपरेची दीर्घकालीनता आणि तिला जोडल्या गेलेल्या श्रद्धा विचारात घेऊन ही परंपरा घटनाबाहय़ नाही असा निकाल दिलेला होता. सदर कथेला घटनात्मक आणि सांस्कृतिक असे दोन्ही संदर्भ आहेत. शबरीमला येथे महिलांना असणारी प्रवेशबंदी ही त्यांना कमी लेखण्यासाठी नसून तिचा संबंध या कथेतून निर्माण झालेल्या परंपरेशी आहे. ही प्रवेशबंदी केवळ शबरीमला या एकाच स्थानी असून इतर कोणत्याही अय्यप्पा मंदिरात अशी बंदी नाही, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. तथापि, आजच्या काळात अशा कथा प्रमाण मानून परंपरा सुरू ठेवणे कितपत योग्य आहे, असाही प्रश्न करण्यात येतो. त्याचप्रमाणे ही कथा सांगितली जाते तितकी पुराणकालीन नाही. तर गेल्या काही शतकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रदीर्घकालीन परंपरांना घटनेने दिलेले संरक्षण येथे दिले जाऊ शकत नाही, अशीही बाजू मांडली जाते. एकंदर हा वाद फारसा धर्मातील तत्वज्ञानाशी किंवा धर्माच्या आज्ञांशी संबंधित वाटत नाही. तर तो परंपरा आणि आधुनिक विचारसरणी यांच्यातील असल्याचे दिसून येते. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर या दोन्ही बाजू सविस्तरपणे मांडण्यात आल्या आहेत. हे पीठ जो निकाल देईल तो सर्वांनी मान्य करणे आणि त्यातून नवे वाद निर्माण होऊ न देणे आवश्यक आहे. घटनापीठाने ही परंपरा घटनात्मक मानली तरी तो निर्णय सर्वांनी मान्य करावा. तथापि, दुसऱया बाजूला ही परंपरा अमान्य करून महिलांना या स्थानी प्रवेश देण्यात आला तरी तो धर्मावर किंवा संस्कृतीवर आघात मानला जाऊ नये. कारण महिलांना कोणत्याही मंदिरात पुरुषांच्या बरोबरीने प्रवेश दिल्याने हिंदू धर्माचे कोणतेही नुकसान होणार नाही. उलट धर्म अधिक बळकट होईल. त्यामुळे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाचा मान राखून त्याप्रमाणे कृती करणे योग्य ठरेल. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधण्यामध्येच सर्वांचे हित आहे. एक सूचना मात्र आवर्जून करावीशी वाटते. महिला आणि पुरुष यांच्या समान अधिकाराचा मुद्दा केवळ हिंदू समाजापुरताच मर्यादित ठेवू नये. इतर सर्व समाजांनाही तसाच न्याय द्यावा. हिंदू पुरुष आणि महिलांमध्ये समानता आणताना हिंदू महिलांचे अधिकार आणि इतर धर्मांमधील महिलांचे अधिकार समान केले जावेत एवढीच अपेक्षा आहे. 

 

Related posts: