|Friday, March 22, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताची न्यूझीलंडवर 4-2 ने मात

भारताची न्यूझीलंडवर 4-2 ने मात 

वृत्तसंस्था /बेंगळूर :

येथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने 4-2 असा दणदणीत विजय मिळवला. गुरुवारी झालेल्या पहिल्याच लढतीत रुपिंदरपाल सिंगने दोन तर मनदीप सिंग व हरमनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. विशेष म्हणजे, पुढील महिन्यात होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेआधी भारतीय संघाच्या तयारीसाठी या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 21 रोजी होईल.

बेंगळूरातील क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर झालेल्या लढतीत भारताने प्रारंभापासून आक्रमक खेळ केला. सामन्यातील दुसऱयाच मिनिटाला रुपिंदरपालने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताचे खाते उघडले. यानंतर, 15 व्या मिनिटाला मनदीप सिंगने दुसरा गोल करत पूर्वार्धातच भारताला 2-0 अशी भक्कम आघाडी घेऊन दिली. दुसऱया सत्रात न्यूझ्^ााrलंडच्या स्टीफनने 26 व्या मिनिटाला गोल करत आघाडी 2-1 अशी कमी केली. तरीही मध्यंतरापर्यंत भारताने आघाडी कायम राखली होती.

मध्यंतरानंतरही भारताने आक्रमणाचा धडाका कायम ठेवताना दोन गोल केले. 34 व्या मिनिटाला रुपिंदरने तर 38 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला 4-1 असे आघाडीवर नेले. तिसऱया सत्रात 47 व्या मिनिटाला भारताल पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची नामी संधी होती पण न्यूझीलंडच्या भक्कम बचावासमोर भारताला गोल नोंदवता आला नाही. यानंतर, सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना स्टीफनने गोल करत न्यूझीलंडची आघाडी 4-2 ने कमी केली. शेवटच्या तीन मिनिटात न्यूझीलंडला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारतीय गोलरक्षक सुरज केरकेरच्या बचावासमोर न्यूझीलंडला गोल करता आला नाही. अखेरपर्यंत भारताने 4-2 अशी आघाडी कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात दोन गोल करणारा ड्रगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, मनदीप सिंग व हरमनप्रीत सिंग यांनी आपली चमक दाखवून दिली. आशियाई स्पर्धेत विद्यमानजेता असलेल्या भारतीय संघाकडून यंदाच्या स्पर्धेतही चमकदार कामगिरीची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक जोर्द मरिन यांनी दिली.

Related posts: