|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दुधाला 25 रुपये दर मिळणार

दुधाला 25 रुपये दर मिळणार 

विशेष प्रतिनिधी /नागपूर :

दूधबंद आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर राज्य सरकारने गुरुवारी दुधाला 25 रुपये प्रतिलिटर खरेदी दर मान्य केला. सरकारचे अनुदान घेणाऱया सर्व दूध संघांनी 25 रुपये दराने शेतकऱयांकडून दूध खरेदी करावे, असे आवाहन सरकारने केले आहे. ही नवीन दरवाढ 21 जुलैपासून लागू होईल. मात्र, जे दूध भुकटी उत्पादक प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा लाभ घेतील त्यांना निर्यातपर अनुदान लागू राहणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या चार दिवसापासून दूध आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात दूध ओतण्यापासून ते टँकर पेटवून देण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली. मुंबईसह प्रमुख शहरांना होणारा दुधाचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न झाला. या आंदोलनाचे पडसाद विधिमंडळात उमटले होते. सरकारने 10 जुलै रोजी दूध आणि भुकटीसाठी अनुदान जाहीर करूनही आंदोलन थांबले नाही.

या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीत सहकारी आणि खासगी दूध संघाच्या प्रतिनिधींनी एकमताने  दुधाचा खरेदी दर 25 रुपये इतका मान्य केला. परंतु, शेतकऱयांना थेट लिटरला पाच रुपये अनुदान देण्याची मागणी अमान्य करण्यात आली. शेतकऱयांऐवजी खासगी, सहकारी दूध संघांना अनुदान दिले जाणार आहे.

10 जुलैच्या निर्णयाप्रमाणे दूध निर्यातीसाठी प्रतिलिटर पाच रुपये तर दूध भुकटीकरीता प्रति किलो 50 रुपये अनुदान दिले जाईल. मात्र, दूध पुरवठा करणारी संस्था किंवा दूध रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेला अनुदान लागू असेल. पिशवीबंद दुधासाठी हे अनुदान लागू राहणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, सतेज पाटील, आमदार सुरेश धस, राहुल मोटे, राहुल कुल आदी उपस्थित होते.

Related posts: