|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘फॉर्मेलिन’मुळे विधानसभा पाचवेळा तहकूब

‘फॉर्मेलिन’मुळे विधानसभा पाचवेळा तहकूब 

प्रतिनिधी /पणजी :

गेल्या काही दिवसापासून राज्यात गाजत असलेल्या आणि खळबळ माजवणाऱया फॉर्मेलिनयुक्त मासळीच्या ज्वलंत विषयाचे तीव्र पडसाद काल गुरुवारी विधानसभा अधिवेशनात पहिल्याच दिवशी उमटले. विरोधी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी कामकाज रोखत त्याच विषयावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली आणि विधानसभेचे कामकाज संपेपर्यंत कायम ठेवली. विरोधकांनी वारंवार सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केल्याने त्यांना दिवसभरात तब्बल पाचवेळा कामकाज तहकूब करावे लागले. गोव्याच्या इतिहासात अशा प्रकारे कामकाज तहकूब करण्याची ही पहिलीच घटना असावी.

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज राष्ट्रगीताने सकाळच्या सत्रात साडेअकरा वाजता सुरु झाले. सभापती डॉ. सावंत यांनी प्रश्नोत्तर तास पुकारताच विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी उभे राहून परराज्यातून गोव्यात येणाऱया फॉर्मेलिनयुक्त मासळीचा विषय उपस्थित केला आणि त्यावर प्रथम चर्चा करण्याची मागणी केली. काँग्रेस व इतर आमदारांनीदेखील उभे राहून ती मागणी लावून धरली. अशा प्रकारच्या मासळीमुळे गोव्याची जनता भयभीत झाली असून मासळी मार्केट ओस पडली आहेत. एकंदरित वातावरण गंभीर झाले असून त्यावर सरकार काय उपाययोजना करणार आणि काळजी घेणार ते प्रथम सांगावे, अशी मागणी कवळेकर यांनी केली.

Related posts: