|Friday, April 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शिवसेनेचा मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा

शिवसेनेचा मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

केंद्रातील मोदी सरकारविरोधात मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील मतदानात सरकारचीच सरशी होईल, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे. आज शुक्रवारी या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. भाजपचा जुना मित्र असणाऱया शिवसेना पक्षाने प्रस्तावाच्या विरोधात भाजपची साथ करण्याचा निर्णय घेतला आहे. अकाली दलानेही प्रस्तावाला विरोध करण्याचे ठरविले आहे. अण्णाद्रमुक पक्ष प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता असून तसे झाल्यास आपल्या संख्याबळापेक्षा अधिक मते सरकारी पक्षाला मिळू शकतील असे चित्र आहे.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रस्ताव चर्चेला घेतला जाईल. यासाठी लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास रद्द केला जाईल. सलग सात तास चर्चा झाल्यानंतर मतदान होईल. मोदी सरकारची ही पहिलीच अग्निपरीक्षा असून दोन्ही बाजूंनी गुरूवारी जोरदार सज्जतेचे प्रयत्न करण्यात आले. हा प्रस्ताव तेलगु देशम पक्षाने मांडला असून काँगेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँगेस, द्रमुक, डावे पक्ष इत्यादी 12 पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

सरकारला बहुमताची खात्री

सध्या भाजपच्या 271 सदस्यांसह आणि लोकसभाध्यक्ष धरून रालोआचे 314 सदस्य आहेत. तर 543 सदस्यांच्या लोकसभेतील चार जागा रिक्त असल्याने बहुमताचा आकडा 270 आहे. भाजप स्वबळावर तो पार करू शकतो. मात्र रालोआमधील एकात्मतेचे दर्शन घडविणे हे भाजपसाठी तितकेच महत्वाचे आहे. त्यादृष्टीने सरकारची बाजू तयार केली जात आहे.

अमित शहा-उद्धव ठाकरे चर्चा

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी सकाळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून पाठिंबा देण्याची विनंती केली. ती मान्य करत ठाकरे यांनी शिवसेना खासदारांसाठी आदेश काढून त्यांना सरकारच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भाजप निश्चिंत झाला आहे. अकाली दलानेही भाजपशी युती अतूट असल्याचे म्हणत पाठिंबा घोषित केला.

Related posts: