|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ओणी येथे होणार सुपर मल्टीस्पेशालिस्ट रूग्णालय?

ओणी येथे होणार सुपर मल्टीस्पेशालिस्ट रूग्णालय? 

जिल्हाधिकाऱयांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांच्या शिफारशीनंतर बांधकाममंत्री पाटील यांचा निर्णय

आमदार राजन साळवींच्या पाठपुराव्याला यश

प्रतिनिधी /राजापूर

राजापूर तालुक्यात सुपर मल्टिस्पेशालिस्ट रूग्णालय उभारण्यात यावे ही गेल्या अनेक वर्षाची मागणी आता पुर्णत्वास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार राजन साळवी यांच्या सततचा पाठपुरावा व पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या शिफारशीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गालगत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील गोर-गरीब रुग्णांना औषधोपचार मिळण्यासाठी जवळच्या ठिकाणी कुठेही अद्ययावत सोयींनी युक्त असे रुग्णालय उपलब्ध नाही. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत तसेच विविध सणांनिमित्त मुंबईतून कोकणात येण्याजाणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. तसेच देश विदेशातील पर्यटकही येथील विविध पर्यटन स्थळांना भेटी देतात. अशातच मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. परंतु राजापुरमध्ये अद्ययावत असे रुग्णालय नसल्याने अपघातग्रस्तांना वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्यामुळे यापुर्वी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बहुतांशवेळा या मार्गावरील अपघातग्रस्तांना कोल्हापुर व मुंबई येथील रुग्णालयात दाखल करावे लागते.

त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या मध्यवर्ती अशा राजापूर तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत असे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. या मागणीकडे आमदार राजन साळवी यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी येथील जनतेची ही अडचण लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद वायकर यांचे याकडे लक्ष वेधून घेतले होते. राजापूर तालुक्यातील ओणी येथे ओणी पाचल मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची सुमारे 70 गुंठे जागा मोकळी असून याठिकाणी हे रूग्णालय बांधण्यात यावे असे आमदार साळवी यांनी शासनाला सुचित केले होते.

आमदार साळवी यांच्या या मागणीला गतीने चालना देण्यासाठी व मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱया अपघातग्रस्त रुग्णांना व रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील गोर-गरीब रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळावे यासाठी राजापूर तालुक्यातील ओणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा देण्यात यावी या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची अधिवेशन दरम्यान भेट घेऊन याबाबत एक लेखी पत्रान्वये शिफारस केली आहे. त्याची दखल घेऊन चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा असे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

आता जिल्हाधिकारी याप्रकरणी आपला प्रस्ताव कधी सादर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. मात्र सद्यस्थितीत या प्रकरणाला गती मिळाली असून लवकरच राजापूर तालुक्यातील ओणी येथे सुपर मल्टिस्पेशालिस्ट रूग्णालय होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Related posts: