|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डिजिटल वजनकाटे घेऊन व्यापारी बाजारात दाखल

डिजिटल वजनकाटे घेऊन व्यापारी बाजारात दाखल 

पडेल कॅन्टीन येथील प्रकारः ‘स्वाभिमान’कडून स्वागतः सरपंच घेणार व्यापाऱयांची बैठक

प्रतिनिधी / विजयदुर्ग:

पडेल कॅन्टीन येथे बोगस वजनकाटय़ांनी ग्राहकांच्या होणाऱया फसवणुकीची स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पोलखोल करताच गुरुवारच्या आठवडा बाजारात व्यापारी डिजिटल वजनकाटे घेऊन दाखल झाले. व्यापाऱयांच्या या निर्णयाचे स्वागत करुन स्वाभिमानचे भूषण बोडस, वैभव वारीक आदी कार्यकर्त्यांनी व्यापाऱयांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. दरम्यान, पडेल सरपंच विकास दीक्षित यांनी
ग्राहकांच्या हितासाठी व्यापाऱयांची लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले.

पडेल कॅन्टीन येथील आठवडा बाजारात बाहेरुन येणारे काही व्यापारी बोगस वजनकाटे वापरत असल्याची तक्रार ग्राहकांनी स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे केली होती. त्यानुसार, गेल्या आठवडा बाजारात ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱयांना नजरकैदेत ठेवून रंगेहाथ पकडले होते. ग्राहकांनी खरेदी केलेला माल संशयित व्यापाऱयांच्यासमोरच तपासणी करण्यात आला. यात गैरप्रकार दिसून आल्याने ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांनी संशयित व्यापाऱयांची चांगलीच कानउघडणी करताच व्यापाऱयांनी तेथून पळ काढला होता. दरम्यान, ‘स्वाभिमान’च्या या भूमिकेचा परिणाम 19 जुलै रोजी भरलेल्या आठवडा बाजारात दिसून आला. बाहेरून आलेल्या व्यापाऱयांनी आपल्यासोबत डिजिटल वजनकाटे आणल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी या व्यापाऱयांचे गुलाबपुष्प देऊन ग्राहकांशी प्रामाणिक व किफायतशीर व्यवहार करण्याचे आवाहन केले. काही व्यापाऱयांनी पुढील आठवडा बाजारात डिजिटल वजनकाटे आणणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी अंकुश ठुकरुल, रवी घाडी आदी उपस्थित होते.

सरपंच घेणार व्यापाऱयांची बैठक

पडेल कॅन्टीन येथे भरणारा आठवडा बाजार दशक्रोशीतील सर्वाधिक मोठा बाजार असून येथे बाहेरील व्यापारी मोठय़ा संख्येने दाखल होतात. ग्राहकांच्या हितासाठी ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. आठवडा बाजारातील अन्य विषयांसह ग्राहक व व्यापाऱयांच्या हितासंदर्भात आपण येत्या काही दिवसात व्यापाऱयांची बैठक घेणार असल्याचे सरपंच दीक्षित यांनी सांगितले.

Related posts: