|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धतीचा स्वीकार करा!

प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धतीचा स्वीकार करा! 

निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांचे आवाहन : दोडामार्ग हळबे महाविद्यालयात ‘गुरुकुल शिक्षण पद्धत’ व्याख्यान

वार्ताहर / झरेबांबर:

 प्राचिन काळात स्वावलंबन, नैतिकता, संस्कार व आत्मविश्वास निर्माण करणाऱया गुरुकुल शिक्षण पद्धतीची गरज तीव्रतेने निर्माण झाली आहे. जगात सर्वात उत्तम शिक्षण देणाऱया फिनलॅण्डसारख्या देशाने भारत देशासारख्या गुरुकुल शिक्षण पद्धतीचा आज स्वीकार केला असून इतर राष्ट्रही या पद्धतीचे अनुकरण करीत आहेत. ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची व विस्तारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग   जिल्हय़ाचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी केले. 

 दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयामध्ये ‘गुरुकुल शिक्षण पद्धती’या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील हे हेते.

  जोशी पुढे म्हणाले, ब्रिटिश काळात कारकुनी निर्माण करणाऱया मेकॉलच्या शिक्षण पद्धतीमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले असून स्वातंत्र्योत्तर काळातही प्रत्येकजण नोकरीच्या मागे धावत आहेत. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी अशी स्थिती असणाऱया भारतात आज उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे नोकरीसाठी भीक मागणाऱयांची संख्या अधिक वाढल्यामुळे देशाच्या विकासावर भयानक परिणाम होत आहे.

 यावेळी दोडामार्ग तहसीलदार एस. डी. दर्पे, कुडासे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य वाघमोडे, सी. डी. सी. सदस्य बी. के. वाघमोडे, केसरकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्र. प्राचार्य, पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 यावेळी डॉ. पाटील म्हणाले, श्री. जोशी यांची चाकोरीबाहेर राहून काम करणारे प्रशासकीय अधिकारी अशी ख्याती असून वॉटर काँझर्व्हेशन, आपत्ती व्यवस्थापन, प्राणायाम योगद्वारे कर्मचाऱयांत मनःशांती व आत्मविश्वास निर्माण करुन त्यांच्यात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कार्यक्षमता वाढविणाऱया व गुरुकुल शिक्षण पद्धतीचा पुरस्कार आदी विविध क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱया जोशी यांचा प्राचार्य डॉ. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमादरम्यान कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक संजय खडपकर सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पाटील, सूत्रसंचालन प्रा. सोपान जाधव यांनी तर आभार प्रा. दिलीप बर्वे यांनी मानले.

Related posts: