|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिनगारेंनी सहकार क्षेत्रात ठसा उमटवावा

शिनगारेंनी सहकार क्षेत्रात ठसा उमटवावा 

प्रतिनिधी/ दहिवडी

सहकार क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱया व्यक्तीला अधिक महत्त्व प्राप्त होते. सहकाराच्या माध्यमातून झालेली विकासकामे दीर्घकालीन परिणाम दाखवून देतात. आज यशवंतशेठ शिनगारे यांच्यासारख्या व्यक्तीला सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी सहकार क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवावा. त्यांच्या पाठिशी राष्ट्रीय समाज पक्ष आणि भाजप आघाडी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र सहकार आघाडीचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली.

 बिजवडी, (ता. माण) येथील विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय समाज पक्ष आणि भाजप आघाडीचे यशवंतशेठ शिनगारे यांची निवड झाली. तद्नंतर झालेल्या त्यांच्या सत्कारप्रसंगी देसाई बोलत होते. रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ विरकर, पिंटूशेठ जगदाळे, संदीप भोसले, विठ्ठलराव गायकवाड, समीर ओंबासे, तडवळेचे सरपंच महादेव पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अनिल देसाई पुढे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राने आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. विकास सेवा सोसायटय़ांच्या माध्यमातून शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्याची संधी यशवंतशेठ शिनगारे यांना मिळाली असल्याचे सांगितले. 

मामूशेठ विरकर म्हणाले, बिजवडी परिसरातील यशवंतशेठ शिनगारे यांना सोसायटीच्या अध्यक्षपदावर काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. शेतकरी आणि सहकार क्षेत्र यातील दुवा म्हणून सोसायटय़ा आज उत्तम काम करीत आहेत. प्रारंभी अनिल देसाई यांच्या हस्ते यशवंतशेठ शिनगारे यांचा सत्कार करण्यात आला.