|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पूरस्थितीत प्रशासनाने सज्ज रहावे

पूरस्थितीत प्रशासनाने सज्ज रहावे 

मंत्री रमेश जारकीहोळी यांचे आदेश : चिकोडी येथे जिल्हास्तरीय बैठक

प्रतिनिधी/   चिकोडी

महापूर व दुष्काळप्रसंगी तेवढेच खेडय़ांकडे लक्ष देण्याऐवजी ग्रामीण भागातील समस्यांना शाश्वतपणे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱयांनी दूरदृष्टीकोनातून कार्य केले पाहिजे, असे मंत्री रमेश जारकिहोळी यांनी सांगितले. चिकोडी शहरातील शासकीय विश्रामधामात शनिवारी सकाळी बेळगाव जिल्हास्तरावरील अधिकाऱयांच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व जलाशये तुडूंब भरली असून जुलै महिन्याच्या शेवटच्या सत्रात जर पावसाने पुन्हा हजेरी लावली तर महापूर येण्याची दाट शक्यता असून या समस्येस तोंड देण्यास अधिकाऱयांनी सज्ज रहावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱयांना दिली.

महाराष्ट्रातून 1 लाख क्युसेक पाणी कृष्णेच्या प्रवाहात येऊन मिसळत आहे. 3 लाख क्युसेकहून अधिक पाण्याचा प्रवाह जर महाराष्ट्रातून आला तर महापूर येऊन माठा फटका बसण्याची शक्यता असल्याने महसूल व पोलीस खात्यातील अधिकाऱयांनी निष्ठेने आपले कार्य करावे. महापुरामुळे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावणे गरजेचे आहे, असे सांगितले. अधिकाऱयांनी महापुरामुळे वाडय़ा वसतीत व शालेय आवारात पाणी साचून राहिलेले असते ते पाणी आरोग्यास हानिकारक असल्याने ते बाहेर काढण्यास प्रयत्न करण्याबरोबरच नदीकाठावरील गावातील महापुरामुळे झालेल्या रस्त्यांच्या हानीचा अहवाल तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली. याचबरोबर महसूल, आरोग्य, कृषी, बागायत, जिल्हा पंचायत आदी खात्यातील अधिकाऱयांनी महापुराचा फटका बसलेल्या गावांची समिक्षा करुन पीक हानी, घरांची पडझड तसेच इतर सरकारी मालमत्तेचे झालेले नुकसान याविषयी कोणताही भेद भाव न करता अहवाल तयार करावा असे सांगितले.

25 कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलविले

जिल्हाधिकारी एस. जियाउल्ला म्हणाले, महापुराच्या समस्येस तोंड देण्यास जिल्हा व तालुका प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. शुक्रवारी नदीतीरावर पाहणीस गेले असता 25 कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. संभाव्य महापुराचा धोका ओळखून भाडे तत्वावर बोटी मागविण्यात आल्या आहेत. पोलीस खात्याच्याही दोन बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. नदीकाठावरील लोकांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे.

हेस्कॉमचेही मोठे नुकसान

हेस्कॉमशी संबंधित माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, पावसामुळे अनेक विजेचे खांब कोसळले असून सुमारे 5.91 कोटीचे नुकसान झाले आहे. हेस्कॉम विभागाने नियमानुसार विजेचे खांब उभे केले पाहिजेत अशी सूचना केली. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली महापूर परिस्थिती हाताळणी समितीची रचना करण्यात आली असून यामध्ये तालुका स्तरावरील सर्व खात्यातील अधिकाऱयांचा समावेश आहे. ही समिती सदैव नदीकाठावरील गावांवर लक्ष केंद्रित केली असल्याचेही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले. आमदार गणेश हुक्केरी, अथणीचे आमदार महेश कुमटळ्ळी, विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा पंचायतीचे सीईओ रामचंद्रन, प्रांताधिकारी गीता कौलगी, बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त शशिधर, प्रविण बागेवाडी, जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी सुधीर कुमार रेड्डी, पोलीस आयुक्त डॉ. सी. राजप्पा, डीवायएसपी दयानंद पवार, एडीएचओ डॉ. सदाशिव मुन्याळ, तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, सीपीआय एम. एस. नायकर यांच्यासह बेळगाव जिल्हा व तालुका स्तरिय विविध खात्यांचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

मंत्रीमहोदयांची अधिकाऱयांसोबत विविध गावांना भेट

मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सरकारचे मुख्य प्रतोद आमदार गणेश हुक्केरी, अथणीचे आमदार महेश कुमटळ्ळी, विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, जिल्हाधिकारी एस. जियाउल्ला, पोलीस आयुक्त, जिल्हा वरीष्ठ पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी आदीसोबत कृष्णा काठाचा ठिकठिकाणी जाऊन आढावा घेऊन पाहणी केली.

चिंचली-रायबाग परिसरात जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी

चिंचली : येथील चिंचली-रायबाग पूल कृष्णा नदीच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोरब-चिंचलीमार्गे सुरु आहे. चिंचली-रायबाग पूलाला जिल्हाधिकारी एस. जियाऊल्ला, जि. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी आर. रामचंद्रन व जिल्हा पोलीसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना पूरस्थितीची दररोज माहिती द्यावी, अशी सूचना केली. यावेळी प्रांताधिकारी गीता कौलगी, तहसीलदार डी. एस. जमादार, डॉ. मोहन बसमे, ग्रामतलाठी जगदीश कित्तूर, प्रशांत पाटील, चिंचली नगरपंचायत मुख्याधिकारी के. एम. किलारे, उपनिरीक्षक मोकाशी, नगरसेवक जाकीर तरडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कृष्णेच्या पाणी पातळीत घट

कुडची : कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यात घट झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदी काठावरील नागरिकांसह प्रशासनाने सुटकेचा निश्वास घेतला आहे. कृष्णानदीच्या पात्रात सतत येत असलेल्या पाण्याने रायबाग तालुक्यातील 12 गावांवर पुराचे संकट दिसून येत होते. त्यामुळे दररोज वाढणाऱया पाणी पातळीने प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. प्रत्येक गावात नोडल अधिकाऱयांमार्फत पूर परिस्थितीवर नजर ठेवून होते. कृष्णेच्या पात्रात गत 24 तासात 8 इंच पाणी उतरले असून येत्या एक-दोन दिवसात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.  पावसानेही उघडीप दिल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यताही धूसर आहे. जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, प्रातांधिकारी गीता कौलगी यांनी दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती. कृष्णा काठावरील नागरिकांचे कुटुंबासह सुरक्षितस्थळी स्थलांतर केले होते. कुडची-उगार मार्गावरील पुलासह चिंचली-रायबाग मार्गावरील दूध ओढय़ावर महापुराचे पाणी आल्याने रस्ते बंद झाले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. जमखंडी, मुधोळ, तेरदाळ, हारूगेरी येथील नागरिकांना मिरज व कोल्हापूरकडे जाण्यासाठी रेल्वेचा मोठा आधार मिळाला होता. त्यामुळे कुडची रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली होती.

Related posts: