|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत काँग्रेसची भाजपाविरोधी बॅनर‘बाजी’

मुंबईत काँग्रेसची भाजपाविरोधी बॅनर‘बाजी’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

येत्या 2019च्या निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच पाऊल उचलल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी काँग्रेसने नवीन घोषणादेखील निश्चित केली आहे. शुक्रवारी लोकसभेमध्ये सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात जो काही शब्दप्रयोग केला, त्यांचाच आधार घेत पक्षाने प्रसिद्धीसाठी नवीन घोषणा बनवली आहे.

या नवीन टॅगलाइनद्वारे काँग्रेस प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, या टॅगलाइनसहीत मुंबई काँग्रेसने अंधेरी परिसरात राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीचे पोस्टर लावले आहे. संसदेतील भाषण संपताच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आलिंगन दिले. यावेळी राहुल गांधींनी उपोधिकपणे असे म्हटले की, मोदी, आरएसए आणि भाजपाचे आपण आभारच मानतो. त्यांच्यामुळेच आपणास भारतीय असणं काय असते हे समजू शकले. अशा शब्दांत राहुल गांधींनी टोला हाणला. ते पुढे असंही म्हणाले की, माझ्या मनात तुमच्याविषयी क्रोध वा द्वेष नाही. कारण मी काँग्रेसी आहे. काँग्रेसमध्ये क्रोध, द्वेषाला जागाच नाही. आम्ही भाजपामध्येही प्रेमाचे वातावरण निर्माण करू आणि तुम्हाला काँग्रेसी बनवू , अशा शब्दांत आपले भाषण संपवून राहुल गांधी पंतप्रधानांच्या स्थानापाशी गेले. ते का आले, हे मोदींना लक्षात आले नाही. तोपर्यंत राहुल गांधी यांनी मोदींना मिठी मारली आणि आपल्या जागेवर परतले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लोकसभेत जे काही म्हटले किंवा केले, हे त्यांच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशात अफवांमुळे लोकांना मारहाण करण्यात येत आहे, द्वेष पसरवला जात आहे, हत्याकांड घडत आहे. याविरोधात काँग्रेसनं इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई काँग्रेसने रस्त्या-रस्त्यांवर राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आलिंगनाच्या फोटोचे पोस्टर लावले आहे. सोशल मीडियावरदेखील हे पोस्टर व्हायरल झाले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल यांच्या आलिंगनाच्या फोटोसहित मोठय़ अक्षरांमध्ये ‘नफरत से नही प्यार से जितेंगे’ असे शब्द लिहिण्यात आले आहे.