|Friday, March 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » काँग्रेस कार्यकारिणी : जुने जाऊ द्या मरणालागुनी

काँग्रेस कार्यकारिणी : जुने जाऊ द्या मरणालागुनी 

बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील एकाही नेत्याला काँग्रेस कार्यकारिणीवर न घेऊन राहुलनी या चार राज्यात एकप्रकारे गोंधळच उडवून दिलेला आहे. ‘मी करेन ते पूर्व’ हे धोरण संसदीय लोकशाहीत चालत नसते.

राहुल गांधी यांनी एकदाची काँग्रेस कार्यकारिणी नेमली. काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर सात महिन्यांनी का होईना अखेर त्यांनी ती नेमली. पण यातून त्यांनी खरोखरच काय साधले, हा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. तो सर्वस्वी चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. कोणताही नवा नेता आला की तो एकटा येत नसतो. आपली टीम घेऊन येत असतो. धोनीचा भारतीय संघ क्रिकेट नियामक मंडळ जरी ठरवत असले तरी तसे करताना कप्तानाच्या मनाचा विचार केला जातो. त्याच्याशी विचारविनिमय केला जातो. त्याला अजिबात नको असलेला खेळाडू लादला जात नाही. कप्तान धोनी असो वा विराट कोहली त्याला जसा संघ हवा असेल तसा दिला जातो. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यासारखे खेळाडू होते तेव्हा ते कप्तान असोत वा नसोत पण त्यांच्या मताचा विचार फक्त केलाच जायचा असे नव्हे तर त्याला मान दिला जायचा. भारतीय क्रिकेट संघ उगीचच नावारूपाला आलेला नाही. त्यात संघभावना महत्त्वाची मानून बांधणी केली गेली आहे.

राहुल गांधीनी बांधलेल्या काँग्रेसच्या संघाविषयी मात्र असे म्हणणे धारिष्टय़ाचे ठरेल. कारण काँग्रेसच्या बाबतीत राहुलच सबकुछ. त्यामुळे नव्या काँग्रेस कार्यकारिणीमध्ये जे काय बरेवाईट आहे त्याचे धनी राहुलच होत.

तरुणाईवर भर

काँग्रेस हा म्हाताऱया कोतऱयांचा पक्ष मानला जातो. त्यामुळे त्यात त्यांचाच भरणा दिसतो पण बरेच पावसाळे पाहिले असल्याने ही नेतेमंडळी घाग झाली आहेत. ‘त’ म्हटले की ‘ताकभात’ हे ते लगेच ओळखतात. काँग्रेस म्हणजे एक एकसंध पक्ष नसून वेगवेगळय़ा विचारांचे कडबोळे होय. स्वातंत्र्याच्या आंदोलनात महात्मा गांधींनी सर्वांचीच साथ घेतल्याने त्यांनी जनसामान्यांना आकृष्ट केले आणि इतिहास घडवला. नेहरू-गांधी घराण्याचे 5वे वारसदार असलेल्या राहुलना काँग्रेसला सुधारण्याची घाई झाली आहे. निदान त्यांनी ज्या रितीने कार्यकारिणीची घडण केलेली आहे त्यावरून कोणी असा अंदाज बांधला तर तो गैर लागू होणार नाही. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असेच तत्त्व नवीन कार्यकारिणी बांधताना 48 वर्षाच्या राहुलनी मनात धरलेले दिसत आहे. काँग्रेसच्या हिशोबाने 48 वर्षाचा तरुणच असतो. कारण काँग्रेसींचे बडय़ा पदांकरताचे राजकारण 60 नंतर सुरू होते. निदान राजीव गांधी पंतप्रधान होईपर्यंत तरी प्रामुख्याने अशीच स्थिती होती. आता लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची स्वप्ने बघणाऱया काँग्रेस अध्यक्षांना पक्षातीलच जुने जाणते नको झाले आहेत असे चित्र निर्माण झाले आहे. दिग्विजयसिंग, जनार्दन द्विवेदी, सुशीलकुमार शिंदे यांना त्यांनी कार्यकारिणीतून डच्चू दिला आहे तर अहमद पटेल, अंबिका सोनी, ए. के. अँटनी आणि मोतीलाल व्होरा यांना सोनिया गांधींच्या मिनतवारीमुळे सध्यातरी ठेवलेले दिसत आहे. व्होरा हे पक्षाचे खजिनदार असून 89 वर्षाचे आहेत. वार्धक्मयामुळे ते अगदी वाकलेले आहेत. नॅशनल हेराल्डचे ते सर्वेसर्वा असल्यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांनी डागलेल्या कोर्ट केसेसमध्ये अडकलेल्या सोनिया व राहुल गांधी यांनी त्यांचे राज्यसभा सदस्यत्व तसेच कार्यकारिणी सदस्यत्व कायम ठेवलेले दिसत आहे.

महाराष्ट्रातून मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे यांना कार्यकारिणीवर ठेवून शिंदे, शिवराज पाटील, गुरुदास कामत आणि पृथ्वीराज चव्हाण यांची राजकारणातील सद्दी संपली आहे असा संकेतच राहुलनी दिला आहे. बाळासाहेब थोरात, रजनी पाटील, राजीव सातव यांना कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य बनवून राज्यात काँग्रेसच्या नवीन राजकारणाला सुरुवात करण्यात आली आहे. राहुल यांचा हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे सांगणे कठीण आहे. 1995 पासून राज्यात काँग्रेसला उतरती कळाच लागलेली आहे.

राहुल यांचा प्रयोग अंगलट येणार काय?

‘आपल्याला आवडतील त्या नेत्यांना बढती आणि जे आवडत नाहीत त्यांना कात्री हे राहुलतंत्र काँग्रेसच्या कितपत फायद्याचे अथवा तोटय़ाचे हे काळच दाखवेल. पण नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यारूपाने पक्षापुढे तगडे आव्हान असताना असे प्रयोग कितपत संयुक्तिक आहेत असे प्रश्न पक्षवर्तुळात विचारले जात आहेत. 35 वर्षापूर्वी राजीव गांधींनी महाराष्ट्रात जे प्रयोग केले त्यावेळी काँग्रेसची केंद्रात एकहाती सत्ता होती आणि त्यामुळे असे फेरबदल पचवण्याची ताकत पक्षात होती. बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील एकाही नेत्याला काँग्रेस कार्यकारिणीवर न घेऊन राहुलनी या 4 राज्यात एकप्रकारे गोंधळच उडवून दिलेला आहे. ‘मी सांगेन तीच पूर्व’ हे धोरण संसदीय लोकशाहीत चालत नसते. मोदींनी भाजपवर पूर्ण पकड मिळवल्यावरच मर्जीनुसार पक्षात मंडळी नेमणे सुरू केले. लोकसभा निवडणुकीत अवघ्या 44 जागा मिळालेल्या काँग्रेसवर गांधी घराण्याची हुकमत चालत असली तरी पक्षातील राहुलनी दुखावलेली मंडळी वरकरणी शांत राहून आतमधून पक्षाच्या उमेदवारांना सुरुंग लावायचे काम करतील. अथवा नाराज झाल्याने निष्क्रीय होतील व अथवा पक्षांतर करतील. हे तिन्ही रस्ते पक्ष म्हणून काँग्रेसला नुकसानदायकच आहेत. सोनिया गांधी पक्षाध्यक्ष म्हणून दोन दशके टिकल्या कारण त्यांना आपल्या मर्यादा ठाऊक होत्या. त्या ओळखून  पक्ष चालवल्यामुळे त्यांच्या विरोधात कधी फारसे वातावरण निर्माण झाले नाही. अजूनही बरेच नेते राहुलऐवजी सोनियांनाच चाहतात. काँग्रेस कार्यकारिणीत आपल्या ‘होयबां’ची वर्णी लावून राहुलनी वाद निर्माण केला आहे. लढाईला सामोरे जाणारा कोणताही सेनापती सेनेतील लहान-थोरांना साथ घेऊन लढतो आणि विजयश्री खेचून आणतो. लोकसभा निवडणुकीची लढाई लढताना सारा पक्ष पाठीशी असणे गरजेचे आहे. आता पुढील काळात ते काय पावले उचलतात त्यावर काँग्रेसचे यश अवलंबून आहे. मोदी-शहा हे कसलेले खेळाडू आहेत. प्रतिपक्षातील छोटय़ाशा चुकीचा देखील कसा फायदा उठवायचा हे त्यांना चांगले माहीत आहे.

सुनील गाताडे

Related posts: