|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळचे उमळकर भजन मंडळ मराठी चित्रपटात

कुडाळचे उमळकर भजन मंडळ मराठी चित्रपटात 

वार्ताहर / कुडाळ:

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘व्हिसलिंग वूड’ या सिने क्षेत्राशी निगडीत इन्स्टिटय़ूटमधील विद्यार्थ्यांनी एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यात सिंधुदुर्गातील कुडाळ येथील उमळकर भजन मंडळ दिसणार आहे. या चित्रपटात भजन कला सादर करण्याची संधी कोकण कला केंद्राचे अध्यक्ष साईनाथ जळवी यांच्यामुळे या मंडळाला मिळाली.

यापूर्वी त्यातीलच काही विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेला ‘बोगदा’ हा चित्रपट जळवी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गात चित्रित केला होता. त्यामुळे येथील अनेक लोकेशन्स पाहून दुसऱयाही चित्रपटाचे चित्रिकरण सिंधुदुर्गात करायचे ठरले, असे निर्माता करण कोंडे यांनी सांगितले. या चित्रपटाची कथा कोकणातील शेतकऱयांच्या आयुष्यावर असल्यामुळे हा चित्रपट सिंधुदुर्गातील चेंदवण, वालावल, काळसे या भागात चित्रित करण्यात आला आहे. कलाकार म्हणून सावंतवाडीतील नितीन गावडे, कामळेवीर येथील नाटय़कलाकार प्रवीण कोरगावकर आणि देवयानी आजगावकर यांनी शेतकरी कुटुंब म्हणून भूमिका साकारली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेला कलाकारही सिंधुदुर्गातील आहे.

कुडाळलक्ष्मीवाडी येथील उमळकर भजन मंडळ गेली पन्नास वर्षे भजन कला जोपासण्याचे काम करीत आहे. वर्षभर नवनवीन भजनांची तालीम सुरूच असते. ही संधी मिळाल्यामुळे हार्मोनियमवादक अमित उमळकर, मृदंगवादक अतुल उमळकर, तबलावादक साईश उमळकर तसेच बाबा तेली, विजय उमळकर, नामदेव तेली, ज्ञानदेव तेली, लक्ष्मीकांत तेली, सीताराम उमळकर, अमोल उमळकर यांनी चित्रपटाच्या टीमचे आणि जळवी यांचे आभार मानले.