|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जीर्ण झाडांसह आकेशियाच्या झाडांचीही होतेय कत्तल

जीर्ण झाडांसह आकेशियाच्या झाडांचीही होतेय कत्तल 

वार्ताहर / कट्टा:

मालवणकसाल मार्गावरील जीर्ण झालेली झाडे तोडण्याचे काम गुरामवाडी ते कट्टा या परिसरादरम्यान गेले काही दिवस सुरू आहे. परंतु या जीर्ण झालेल्या झाडांसमवेत आकेशिया या चांगल्या झाडांची कत्तल केली जात आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मालवणकसाल मार्गावर सतत दोन दिवस लागोपाठ जीर्ण झालेली झाडे रस्त्यावर कोसळून पडल्याच्या घटना घडत होत्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने मालवणकसाल मार्गावरील जीर्ण झालेली झाडे तोडण्याचे काम हाती घेतले होते. हे काम गुरामवाडीतील स्थानिक लाकूड व्यावसायिकास देण्यात आले. मात्र, या लाकूड व्यावसायिकाकडून रस्त्यालगत असलेल्या आकेशियाच्या झाडांची कत्तल करण्यात आली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे सरकार वृक्ष लागवडीच्या घोषणा करीत आहे. दुसरीकडे सरकारी अधिकाऱयांच्या वरदहस्ताखाली चांगल्या झाडांचीही कत्तल केली जात आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

स्थानिकांनी केले ‘तरुण भारत’चे कौतुक

जीर्ण झालेली झाडे वारंवार रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत होत्या. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत होते. याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत जीर्ण झाडे तोडण्याचे काम हाती घेतले होते. याबाबत येथील स्थानिकांनी ‘तरुण भारत’चे कौतुक केले.