नेमेची येते स्लॅबमधून पाणी

दोडामार्ग मुख्यालय इमारतीची गळती कायम
वार्ताहर / झरेबांबर:
दोडामार्ग तालुक्याच्या मुख्यालय इमारतीला लागलेल्या गळतीने येथील कर्मचारी वर्गाला पाणी व इमारतीपासून धोका निर्माण झाला आहे. इमारतीतील प्रत्येक कार्यालयात पावसाचे पाणी स्लॅबमधून लिकेज होत असल्याने कर्मचारी व नागरिकांसाठी गैरसोईचे आणि धोक्याचे बनले आहे. इमारतीची डागडुजी कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
दोडामार्ग तालुक्याच्या मुख्यालय इमारतीत दरवर्षी पावसाळय़ात उद्भवणारा गळतीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला अहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारामुळे तहसीलमधील कर्मचारी व अभ्यागतांना याचा त्रास दरवर्षी पावसाळय़ात सोसावा लागतो. एवढे असूनही या इमारतीचे कोणालाच सोयर–सुतक नसल्याचे दिसून येत आहे. इमारतीला पावसाळय़ात लागणाऱया गळतीमुळे कार्यालयातील कामकाजाचे कागदपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांनाही धोका निर्माण झाला आहे. या इमारतीत पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात गळती होत असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
उन्हाळय़ात पाणी–पाणी, पावसाळय़ात पाणीच पाणी!
तालुक्याच्या मुख्यालय इमारतीत उन्हाळय़ात पिण्यासाठी व बाथरुमसाठी पाणी–पाणी करत हिंडावे लागते. तर भर पावसात इमारतीमध्ये स्लॅबमधून पावसाचे पाणी प्रत्येक कार्यालयात ठिबकते. इमारतीच्या प्रत्येक कार्यालयात स्लॅबमधून ठिबकणाऱया पाण्यासाठी बादल्या लावाव्या लागतात.