|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » हॉकी कसोटी मालिकेत भारताचे वर्चस्व

हॉकी कसोटी मालिकेत भारताचे वर्चस्व 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडविरुद्ध सलग तिसरा विजय संपादन करताना 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेवर एकतर्फी कब्जा केला. साई प्राधिकरणाच्या मैदानावर झालेल्या तिसऱया लढतीत भारताने किवीज संघाचा 4-0 असा धुव्वा उडवत या मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले. भारतातर्फे रुपिंदरपाल सिंग, सुरिंदर कुमार, मनदीप सिंग व आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.

पहिल्या सत्रात भारताने आक्रमक खेळ साकारला. अगदी पहिल्या मिनिटापासूनच संघाने आक्रमणे केली. सामन्यातील आठव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरपाल सिंगने शानदार गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, लगेचच 15 व्या मिनिटाला सुरिंदर कुमारने भारतातर्फे दुसरा गोल केला व आघाडी 2-0 ने वाढवली. पहिल्या सत्रातच दोन गोल झाल्याने किवीज संघ चांगलाच बॅकफूटवर ढकलला गेला.

दुसऱया सत्रात किवीज संघाने गोल करण्याची नामी संधी होती पण 18 व 23 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात त्यांना अपयश आले. यानंतर, मध्यंतरापर्यंत भारताने 2-0 असे आपले वर्चस्व कायम राखले होते. तिसऱया सत्रात न्यूझीलंडने बरोबरीसाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, त्यांच्या आक्रमणात तितकी धार मात्र दिसून आली नाही. यातच, 44 व्या मिनिटाला सरदार सिंगने दिलेल्या पासवर मनदीप सिंगने चेंडूला जाळय़ाची दिशा दाखवत तिसरा गोल नोंदवला.

चौथ्या व शेवटच्या सत्रातही भारताचाच वरचष्मा राहिला. 60 व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आणि भारताने तिसऱया व शेवटच्या सामन्यात 4-0 असा सफाईदार विजय संपादन केला. जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानी असलेल्या किवीज संघाला मात्र तीनही सामन्यात अपेक्षित कामगिरी साकारता आली नाही.

या विजयानंतर आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतच प्रबळ दावेदार असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी दिली.