|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » लंका विजयाच्या उंबरठय़ावर

लंका विजयाच्या उंबरठय़ावर 

आणखी पाच बळींची गरज 490 धावांच्या आव्हानासमोर द.आफ्रिका 5 बाद 139

वृत्तसंस्था / कोलंबो

दुसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी यजमान लंकेने जिंकण्याच्या आगेकूच केली असून तिसऱया दिवशी दक्षिण आफ्रिकेने 490 धावांचे आव्हान मिळाल्यावर दुसऱया डावात 5 बाद 139 धावा जमविल्या होत्या. लंकेला ही कसोटी जिंकून क्लीन स्वीप साधण्यासाठी आणखी 5 बळी मिळविण्याची गरज आहे तर दक्षिण आफ्रिकेला पराभव टाळण्यासाठी आणखी दोन दिवस खेळून काढण्याचे अशक्मयप्राय आव्हान पेलावे लागणार आहे.

लंकेने पहिल्या डावात 338 धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव लंकेच्या भेदक फिरकीसमोर केवळ 124 धावांत आटोपला. त्यानंतर दुसऱया दिवशीअखेर लंकेने दुसऱया डावात 3 बाद 151 धावा जमविल्या होत्या. तिसऱया दिवशी या धावसंख्येवरून लंकेने खेळास सुरुवात केली आणि 5 बाद 275 धावांवर डाव घोषित करून दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 490 धावांचे अशक्मयप्राय आव्हान दिले. या दौऱयात दक्षिण आफ्रिकन फलंदाज फिरकीसमोर ढेपाळल्याचे पहिल्या कसोटीत दिसून आले होते आणि या सामन्यातही त्याची पुनरावृत्ती झाली.  पहिल्या डावात दिलरुवान परेरा, अकिला धनंजया आणि हेराथच्या फिरकीसमोर त्यांचा डाव 124 धावांत आटोपला. दुसऱया डावात मात्र त्यांच्या फलंदाजांनी थोडीशी सुधारित कामगिरी केली असून दिवसअखेर द.आफ्रिकेने 5 बाद 139 धावांपर्यंत मजल मारली आहे. थेऊनिस डी बुईनने लंकेच्या फिरकी माऱयाला समर्थपणे तोंड देत दिवसअखेरपर्यंत त्याने नाबाद 45 धावा जमविल्या होत्या. बहुमा त्याला 14 धावांवर साथ देत होता. लंकेच्या हेराथ व धनंजया यांनी प्रत्येकी 2 तर दिलरुवान परेराने एक बळी मिळविला होता.

त्याआधी लंकेने आदल्या दिवशीच्या धावसंख्येत आणखी दोन गडी गमवित 124 धावांची भर घालून दुसरा डाव घोषित केला. दिमुथ करुणारत्ने 85 धावा काढून बाद झाला. गेल्या चार डावातील त्याचे हे चौथे अर्धशतक होते. लुंगी एन्गिडीने त्याला बाद केले. त्याने 136 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार मारले. त्याला साथ देणाऱया मॅथ्यूजने 71 धावांचे योगदान दिले. केशव महाराजने त्याची खेळी संपुष्टात आणली. या दोघांनी 63 धावांची भर घातली. मॅथ्यूजने नंतर सिल्वासमवेत आणखी 64 धावांची भर घातली. मॅथ्यूजने आपल्या खेळीत 7 चौकार ठोकले. कर्णधार सुरंगा लकमलने 275 धावसंख्येवर डाव घोषित केला त्यावेळी सिल्वाने नाबाद 32 धावा केल्या होत्या. केशव महाराजने या डावात 3 बळी घेत एकूण 12 बळी मिळविले.

आफ्रिकेच्या डावातही खराब सुरुवात झाली. मार्करम 14 धावा काढून बाद झाल्यानंतर एल्गार व डी बुईन यांनी लंकन फिरकीचा बऱयापैकी प्रतिकार करीत 57 धावांची भागीदारी केली. एल्गारला 37 धावीवर हेराथने पायचीत केल्यानंतर आमला 6, कर्णधार डु प्लेसिस 7, केशव महाराज 0 धावांवर बाद झाले आणि 1 बाद 80 वरून 4 बाद 113 अशी त्यांची घसरगुंडी उडाली. बहुमाने डी बुईनला साथ दिल्याने आणखी पडझड झाली नाही. या सामन्याचे आणखी दोन दिवस बाकी असून पावसाचा अडथळा न आल्यास लंकेचा विजय निश्चित आहे.

संक्षिप्त धावफलक : लंका प.डाव 338, द.आफ्रिका प.डाव 124, लंका दु. डाव 5 बाद 275 डाव घोषित (गुणतिलका 68 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 61, करुणारत्ने 136 चेंडूत 12 चौकारांसह 85, कुशल मेंडिस 18, मॅथ्यूज 147 चेंडूत 7 चौकारांसह 71, सिल्वा 99 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 32, केशव महाराज 3-154, एन्गिडी 1-9), द.आफ्रिका दु.डाव 41 षटकांत 5 बाद 139 (एल्गार 80 चेंडूत 4 चौकारांसह 37, मार्करम 24 चेंडूत 14, डी बुईन 97 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 45, बहुमा 17 चेंडूत नाबाद 14, हेराथ 2-54, धनंजया 2-35, परेरा 1-38).