|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » विठ्ठलालाच मुख्यमंत्र्यांचे दर्शन नको असेल-राज ठाकरे

विठ्ठलालाच मुख्यमंत्र्यांचे दर्शन नको असेल-राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / परभणी :

पंढरपूर मंदिरात विठ्ठलाची शासकीय पूजा न करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत चिमटा काढला आहे. ‘थापा मारणाऱया मुख्यमंत्र्यांचेच दर्शन नको, असे संकेत विठ्ठलानेच दिले असतील,’ असे राज म्हणाले.

पक्ष बांधणीसाठी परभणी जिल्हा दौऱयावर आलेल्या राज ठाकरे यांनी आज सावली विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. ‘कुठलेही काम करायचे असेल तर, सरकारला नागपूर आठवते. रेल्वे नागपूरला, रस्ता नागपूरला. काय चाललंय हे?, विदर्भापुढे महाराष्ट्रातील इतर भागांकडे लक्ष द्यायला भाजपला वेळच नाही. फडणवीस यांचे काही समजतच नाही. महाराष्ट्राचा पैसा वापरून ते स्वतंत्र विदर्भासाठी आराखडे बांधत आहेत,’ असा आरोप राज यांनी केला. तर, ‘शंकरराव चव्हाण, निलंगेकर, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण असे मुख्यमंत्री होऊन गेले तरी मराठवाडय़ाचा विकास काही झालाच नाही, अशी टीका त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही त्यांनी भूमिका मांडली. ‘आरक्षण मागणाऱया मराठा तरूण-तरूणींना काय व कशासाठी मागतो आहोत, हे कोणीतरी सांगायला पाहिजे. आरक्षण नेमके कुठे हवे? बहुतेक शिक्षण संस्था खासगी आहेत, 95 टक्के नोकऱया खासगी उद्योगांकडे आहेत. केवळ 2 ते 3 टक्के सरकारी नोकऱयांसाठी का भांडता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुळात जातीच्या आधारावर आरक्षण नको, असेही ते म्हणाले.