|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दारिस्ते येथील बेपत्ता युवतीचा मृतदेह नदीपात्रात आढळला

दारिस्ते येथील बेपत्ता युवतीचा मृतदेह नदीपात्रात आढळला 

कणकवली:

 रविवारी दुपारी 12.30 वा. पासून कणकवली येथून बेपत्ता असलेल्या अंकिता रवींद्र गुरव (20, दारिस्ते – गुरववाडी) या युवतीचा मृतदेह सोमवारी सकाळी 8 वा. सुमारास गडनदीच्या पात्रात दिगवळे – गावडेवाडी ते दारिस्ते जाणाऱया मार्गावरील बंधाऱयानजीक आढळून आला. अंकिता हिच्या दिगवळे बसथांबा येथून घराकडे जाणाऱया मार्गावर नदीपात्रावर कठडा नसलेला बंधारा आहे. मात्र, ती नदीपात्रात नेमकी कशी पडली, याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता हिचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. सध्या ती कणकवली येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये कामाला होती. रविवारी दुपारी 12.30 वा. सुमारास ती झेरॉक्स सेंटर येथून काम आटोपून दारिस्ते – गुरववाडी येथील घरी जायला निघाली. यावेळी ती कनेडीदरम्यान सहाआसनी रिक्षात बसलेलीही एका नातेवाईकाला दिसली होती. मात्र, त्यानंतही ती घरी पोहोचली नव्हती. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कोठेच आढळून आल्याने वडील रवींद्र बाबजी गुरव यांनी रविवारी सायंकाळी उशिरा पोलीस स्थानक गाठत मुलगी बेपत्ता असल्याची खबर पोलिसांत दिली होती.

दरम्यान, रविवारीच दुपारनंतर दिगवळे – गावडेवाडी ते दारिस्ते जाणाऱया मार्गावरील बंधाऱयानजीक कोणीतरी नदीपात्रात पडल्याची व त्यानंतर ‘वाचवा – वाचवा’ असे आवाज आल्याची माहिती काही ग्रामस्थांकडून दारिस्तेचे पोलीस पाटील हेमंत सावंत यांना समजली. सावंत यांच्यासह दारिस्ते परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गडनदीपात्रात बंधारा परिसरात शोध घेण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण व कनेडी दूरक्षेत्राचे पोलीस राठोड घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत नदीपात्रात कोणीही बुडलेली व्यक्ती आढळून आली नव्हती.

त्यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास पुन्हा नदीपात्रात शोध घेण्यात आला. यावेळी नदीपात्रात बंधाऱयापासून सुमारे 200 मी. अंतरावर अंकिता हिचा मृतदेह झाडीझुडपांमध्ये अडकलेल्या स्थितीत आढळून आला. अंकिता हिच्या मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबियांना धक्काच बसला. कुटुंबीय धाय मोकलुन रडत होते.

मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला. यावेळी कनेडी दूरक्षेत्राचे हवालदार नागरगोजे रुग्णालयात दाखल झाले होते. मृत्यूच्या घटनेची फिर्याद पोलीस पाटील हेमंत सावंत यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार घटनेची पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास कणकवली पोलीस स्थानक व कनेडी दूरक्षेत्राचे पोलीस करीत आहेत.