|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संतप्त पालकांचे शाळेलाच टाळे

संतप्त पालकांचे शाळेलाच टाळे 

तोरसोळे केंद्रशाळेतील प्रकार : कोटकामतेत शिक्षकासाठी मुलांचीच शाळेकडे पाठ

प्रतिनिधी / देवगड:

शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत देवगड तालुक्यातील तोरसोळे व कोटकामते या दोन गावांमधील संतप्त पालकांनी सोमवारी मुलांना शाळेत न पाठविता शाळा बंद आंदोलन छेडले. याची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी दोन्ही शाळांना शिक्षक देण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.

तोरसोळे केंद्रशाळेमध्ये 73 पटसंख्या असून शाळेत केवळ दोनच शिक्षक आहेत. मुख्याध्यापकपद गेली दोन वर्षे रिक्त आहे. 9 जुलै रोजी आदेश देऊनही चव्हाण नामक शिक्षक शाळेत हजरच झालेले नाहीत. कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक कार्यालयीन कामासाठी बाहेर, तर एक शिक्षिका शाळा सांभाळत आहे. संतप्त पालकांनी सोमवारी शाळेलाच टाळे ठोकले. याबाबत गटशिक्षणाधिकाऱयांनाही जाब विचारला. यावेळी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, सरपंच यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ उपस्थित होते. तर कोटकामते येथील केंद्रशाळा नं. 1 मध्ये इयत्ता 1 ते 7 वीचे वर्ग आहेत. या शाळेत 71 पटसंख्या असून पाच शिक्षक मंजूर आहेत. शाळेत तीनच शिक्षक कार्यरत आहेत. पालकांच्या मागणीनुसार उच्चश्रेणी मुख्याध्यापक रामकृष्ण देसाई व कामगिरी शिक्षक जितेंद्र गिरप हे दोन शिक्षक वगळून इतर कोणतेही शिक्षक द्यावे, अशी मागणी केली आहे.

कोटकामते व तोरसोळे या दोन्ही शाळांतील पालकांनी केलेल्या आंदोलनाची गटविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली आहे. दोन्ही शाळांमध्ये तातडीने नवीन शिक्षक देण्याचे आदेश त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.