|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पाटणमध्ये कडकडीत बंद

पाटणमध्ये कडकडीत बंद 

शहर प्रतिनिधी/ पाटण

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी औरंगाबाद येथील सकल मराठा समाजाचा युवक काकासाहेब शिंदे याने स्वत:चे बलिदान देऊन जलसमाधी घेतली. या युवकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटण, मल्हारपेठ, नवारस्ता दौलतनगर येथे मराठा समाजाने कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. बंद काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. 

मंगळवारी सकाळी मराठा समाज नवीन बसस्थानक, झेंडा चौक, लायब्ररी चौक या मुख्य बाजारपेठेत जमावाने उतरला. शहरातील सर्व दुकाने, व्यवसाय, बाजारपेठ बंद ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून व्यापाऱयांनी मराठा मोर्चाला प्रतिसाद दिला. खासगी रिक्षा, वडाप वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती.

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या’, ‘आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत’, अशा  घोषणा देत नवीन बसस्थानक येथे कराड-चिपळूण रस्त्यावर काही काळ रस्ता रोको करून काकासाहेब शिंदे याला श्रद्धांजली वाहिली.

मल्हारपेठमध्ये तीव्र बंदोबस्त

मल्हारपेठ ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच नवारस्ता येथे शिंदे याला श्रद्धांजली वाहून मराठा समाजातील संतप्त नागरिकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यु. एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व विविध मागण्यांसाठी शनिवारीच पाटण तालुक्यातील मराठा समाजबांधवानी पाटण येथे उत्स्फूर्त बंद पाळून झेंडा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केला होता.

ढेबेवाडी, तारळे, चाफळ येथे आज बंद

दरम्यान, या भाजपा व सेना सरकारच्या निषेधार्थ ढेबेवाडी, तारळे, चाफळ येथे आज बुधवार 25 रोजी बंद पाळण्यात येणार असून मोरगिरी येथे शुक्रवार 27 रोजी बंद पाळण्यात येणार असल्याचे या विभागातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.