|Monday, July 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » देहधर्म आणि आत्मधर्म

देहधर्म आणि आत्मधर्म 

देहधर्म आणि आत्मधर्म

अंतर्मुख दृष्टी करून जीव जेव्हा भगवंताजवळ पोचतो तेव्हा भगवान त्या जीवाला विचारतात – माझ्याजवळ कशाला आला आहेस? संसारांत रत रहा. तेथे तुला सुख मिळेल. मी सुख नाही, केवळ आनंदच देऊ शकतो. तुम्ही सर्व परत जा. तिथे तुमची सर्व प्रतीक्षा करीत असतील. एक अर्थ आहे घरी जा. दुसरा अर्थ हा होऊ शकतो कीं जीव भगवंताच्या स्वरूपाला येऊन मिळतो तो घरिं परतून जाऊ शकत नाही.

जीवाला परमात्मा सहसा भेटत नाहीत. जीवाला भ्रांति होते कीं भगवान त्याला संसारांत परतायला सांगत आहेत. तसे तर गोपी म्हणजेच शुद्ध जीव, त्याने संसारांत परत जावे असें भगवंत इच्छित नाहीत. परंतु ते त्याच्या प्रेमाची परीक्षा घेऊ इच्छितात. म्हणून ते म्हणत आहेत कीं सुख संसारात आहे.

श्रीकृष्ण गोपींना म्हणतात- आपापल्या घरिं जा. तो महान पतिव्रता धर्म सोडून इथे कां आल्या आहांत? आपले पति आणि मुले यांना भगवंताचा अंश मानून त्यांची जिवेभावे सेवा कराल तर घरांत राहून देखील तुमचें कल्याण होईल.

भगवान म्हणतात – माझ्या संयोगापेक्षा माझ्या वियोगांतच तुम्हाला अनेक पट अधिक सुख मिळेल. वियोगावस्थेत माझें उत्तम प्रकारे ध्यान स्मरण होत राहील. आणि प्रेम देखील अधिक पुष्ट होईल. संयोगावस्थेत दोषदर्शन सुरू होते. वियोगावस्थेत गुणांचेच स्मरण चिंतन होत असते. तुमचे प्रेम शुद्ध असेल तर तुम्ही माझें स्वरूप प्राप्त करू शकाल. आपले पति आणि मुलें यांना सोडून येथे धावणें बरोबर नाही, योग्य नाही.

भगवंतांनी गोपींना घरी परत जाण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. आज भगवंत इतके नि÷gर कां झाले आहेत? त्यांनी भगवंतांना विचारले, आज तुम्ही असे कां करीत आहांत? भगवंत त्यांना म्हणाले- देहाचा स्वामी पति आहे. आपण पतिव्रता धर्माचे पालन करावे.

याप्रमाणे भगवंतांनी त्यांना देहधर्माचा उपदेश दिला. तर गोपी प्रभूला आत्मधर्माचा उपदेश देऊ लागल्या. या शरीराचा कोणी पिता असेल, पति असेल पण आत्म्याला पिता, पति कोणी असत नाही. आत्म्याचा धर्म प्रभु मीलन आहे. गोपी कृष्णाला म्हणाल्या –

आज तुम्ही इतके नि÷gर कां झाले आहात? तुम्हीच तर सांगितले आहे कीं जो कोणी मोठय़ा भावानें तुमची सेवा, पूजा करतो त्याला आपण भेटता. तर मग आता आम्हाला घरी कां पाठविता? आपण तर पतितपावन दयासागर आहांत, अशा श्रद्धेने आम्ही आपल्या चरणापाशी आलो होतो. आपण असे कठोर का झाला आहात? आम्ही संसारातील सर्वच विषयांचा मनाने त्याग करून आपल्या चरणापाशी शरणागती पत्करण्याचा अटळ निश्चय केला आहे. त्यक्त्वा शब्द विषयांचा शारीरिक त्याग, साधारण त्याग दर्शवितो आणि सन्त्यज्य शब्द विषयांचा मानसिक त्याग, असाधारण त्याग दर्शवितो. सर्वच विषयांचा मनाने सुद्धा त्याग करून भगवंताच्या चरणी शरण जाणारा जीवच गोपी होय.

Ad.  देवदत्त परुळेकर