|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चांदोबा भागला आहे

चांदोबा भागला आहे 

गेल्या आठवडय़ात अचानक सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांमध्ये चांदोबाच्या आठवणी काढणारे लेखन दिसू लागले होते.

1950 ते 2000 च्या पाच दशकात ज्यांचे बालपण गेले त्यांना ‘चांदोबा’ हे नाव नवीन नाही. लहानपणी प्रत्येकाने रंगीबेरंगी चांदोबा वाचलेला असतो आणि त्याच्यावर मनमुराद प्रेम केलेले असते. चांदोबाची आठवण काढली की ही मंडळी व्याकूळ होतात. मी देखील याला अपवाद नाही. चांदोबा अंतर्बाह्य रंगीत असे. त्यात वर्षानुवर्षे विक्रम-वेताळच्या हजारो कथा, आलटून पालटून रामायण-महाभारत, बोधिसत्वांच्या कथा, जादूई कादंबऱया, परोपकारी गोपाळ नावाची अखंड कथामाला असे. दरमहा अंकात दोन छायाचित्रे छापली जात आणि वाचकांसाठी त्या छायाचित्रांवर एक कविता करण्याची स्पर्धा असे. विजेत्या स्पर्धकाला एक रुपया बक्षीस मिळे. रंगीत कथाचित्रांवर संकर आणि चित्रा अशा सह्या असत. कादंबरीमधल्या पात्रांची जयशील, मलयकेतू, मकरकेतू, सिद्धसाधक वगैरे नावे मजेदार होती. चांदोबा भारतातल्या संस्कृतसह अनेक प्रादेशिक भाषांमधून प्रकाशित होई.

लहानपणी ज्या चांदोबावर प्रेम केले त्या चांदोबामधले काही दोष मोठेपणी लक्षात आले. त्यातली भाषा अशुद्ध होती. व्याकरणाच्या असंख्य चुका असत. बंकिमचंद्रांच्या दुर्गेशनंदिनी आणि कपालकुंडला कादंबऱया त्यांनी बिनदिक्कत क्रमशः छापल्या. पण लेखकाला श्रेय दिले नाही. शिवाय मूळ कथांमधले काही प्रसंग बदलले, कमी जास्त केले. हेलन ऑफ ट्रॉय आणि ओडिसी या ग्रीक कथा क्रमशः छापताना पात्रांची नावे भारतीय केली. उदाहरणार्थ पॅरीसचे नाव मोहन केले. पण हे समजल्यावर देखील आमचे चांदोबावरचे प्रेम आटले नाही. लहानपणी आपल्याला जीव लावणारा एखादा गरीब मामा-काका असतो. मोठेपणी आपल्याला त्याचे दोष समजले तरी प्रेम तसेच राहते. तद्वत झाले.  

एका गोष्टीचे नवल वाटते. पाच दशके प्रकाशित झालेल्या चांदोबात मराठीतील एकाही समकालीन प्रथितयश लेखकाचे किंवा पूर्वसुरिंचे साहित्य प्रकाशित झालेले आढळत नाही. तरी चांदोबा ‘हिट’ झाला. चांदोबाची मराठी आवृत्ती कोण लिहित असेल याचे अजून कुतूहल आहे. आंतरजालावर देखील चांदोबाशी संबधित एकही मराठी लेखकाचे नाव सापडत नाही. चित्रकारांच्या यादीत मात्र एम. गोखले हे नाव दिसते. हे एम. गोखले कोण, त्यांनी चांदोबाखेरीज अन्य मराठी नियतकालिकांसाठी अथवा पुस्तकांसाठी चित्रे काढली आहेत का याचीही कल्पना नाही.  आता तर चांदोबा कधीच भागला आहे. 2013 सालच्या सुमारास त्याचे प्रकाशन बंद झाले. पुन्हा उगवेल तेव्हा उगवेल.