|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » महाठोकमोर्चा

महाठोकमोर्चा 

मुंबई,

   मराठा क्रांती मोर्चाने बुधवारीही हिंसक वळण घेतले. यात ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या. सांगलीत आंदोलकांनी कृष्णा नदीत प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केले. तर साताऱयात तुफान दगडफेकीच्या घटना घडल्या. यात   21 पोलीस जखमी झाले. तसेच नगरमध्ये आमदारांच्या घरावर आणि कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक करण्याबरोबरच एक बस पेटवून दिली. आर्थिक राजधानीतही कडकडीत बंद पाळण्यात आला. औरंगाबादमध्ये आंदोलनादरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱया आंदोलकांचा बुधवारी मृत्यू झाल्याने आंदोलनाचा दुसरा बळी गेला आहे. दुपारनंतर मराठा ठोक मोर्चा आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.

   सातारा शहरातील काही भागासह महामार्गावर दुपारी अक्षरशः धुमश्चक्री सुरू होती. काही ठिकाणी तुफान दगडफेकीच्या घटना घडल्या. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह सुमारे 21 पोलीस जखमी झाले आहेत. दगडफेकीत स्थानिक दुकाने, शोरूम लक्ष्य झाले आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडून शांततेचे आवाहन करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. रात्री उशिरापर्यंत 75 आंदोलकांची धरपकड सुरू होती.

भाजप सरकारला अरबी समुद्रात बुडवणार

   मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास 2019 मध्ये भाजप सरकार अरबी समुद्रात बुडवू, असा इशारा सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी दिला. गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेणाऱया काकासाहेब †िशंदे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सांगली येथील कृष्णा नदीच्या पात्रात स्वामी समर्थ घाटाजवळ प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आरक्षणासाठी शिंदे यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जावू देणार नसल्याची शपथ आंदोलकांनी घेतली. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मुख्यमंत्री, चंद्रकांतदादांचा निषेध

मराठा आरक्षण व आंदोलनासंदर्भात बेताल वक्तव्य करणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा आंदोलकांनी तीव्र शब्दात निषेध केला. शासन विरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 2019 च्या निवडणुकीत भाजप सरकार अरबी समुद्रात बुडवू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

सांगलीत प्रचंड पोलीस बंदोबस्त

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वामी समर्थ घाटाला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. प्रचंड पोलिस बंदोबस्त घाटावर तैनात करण्यात आला होता. अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे, शहर विभागाचे उपविभागीय पोलिस उपअधिक्षक अशोक विरकर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र शेळके, ग्रामीणचे निरीक्षक रविंद्र डोंगरे यांच्यासह सुमारे शंभर पोलिसांचा बंदोबस्त घाटावर तैनात करण्यात आला होता.

 गडहिंग्लज बंद कडकडीत

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने जाहीर केलेल्या गडहिंग्लज बंदला बुधवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. एस. टी., रिक्षा वाहतूकही बंद असल्याने बंदची दाहकता वाढली होती. शैक्षणिक संस्थांनीही सुट्टी दिल्याने नेहमी गजबजलेल्या गडहिंग्लज शहरात आज तुरळक गर्दी होती. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर झालेल्या सभेत तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली.

आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही

आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, अशी ठाम भूमिका घेत येथील दसरा चौकात दुसऱया दिवशीही सकल मराठा समाजाने धरणे आंदोलन सुरु ठेवण्यात आले. दिवसभरात विविध पक्ष, संघटनांनी आंदोलनास्थळी येवून पाठींबा दिला. सोमवारी कोल्हापूर कडकडीत बंद ठेवून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर सकल मराटा समाजाने ऐतिहासिक दसरा चौकात ठोक मोर्चा ठिय्या आंदोलन सुरु केले. दुसऱया दिवशी बुधवारी आंदोलनस्थळी विविध पक्ष, संघटनांनी येवून पाठींबा दिला.

आमदार पवारांच्या घराव दगडफेक

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला बुधवारीही हिंसक वळण लागले. नगरमध्ये आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिली. गेवराई शहरात भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यवतमाळमध्ये गाडय़ांवर दगडफेक, जळगाव परळमध्ये ठिय्या आंदोलन, तर धुळय़ात आमदारांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचा पवारांवर निशाणा

काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर  निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी काल मराठा आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यापार्श्वभूमीवर फडणवीस यांनी राजकीय लाभ घेऊ पाहणाऱया नेत्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ व्यापक भूमिका घेऊन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.