|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दशकभरात 1,593 बिबटय़ांचा देशात मृत्यू

दशकभरात 1,593 बिबटय़ांचा देशात मृत्यू 

मार्जर कुळातला बिबटय़ासारखा प्राणी आज इतिहासजमा होण्याच्या वाटेवरती पोहोचलेला असून यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांनी गांभीर्याने विचार करून लोकसहभागाद्वारे त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण समाजाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दशकभरात 1,593 बिबटय़ांना देशाच्या विविध भागात मृत्यू आलेला असून, 2018 सालच्या पहिल्या सहा महिन्यांत 206 बिबटय़ांचा झालेला मृत्यू हा खरेतर केवळ पर्यावरणवाद्यांसाठीच नव्हे तर सर्वसामान्यांसाठीही चिंतेचा विषय ठरलेला आहे. 206 बिबटय़ांपैकी 90 बिबटय़ांची शिकार चक्क शिकाऱयांनी केल्याचे प्रकाशात आलेले आहे. मानव आणि बिबटा यांच्यातला संघर्ष दशकभरापासून शिगेला पोहचलेला असून, काही ठिकाणी जखमी बिबटा नरभक्षक तर काही जाग्यांवरती संत्रस्त माणसे बिबटय़ांच्या जीवावरती उठलेली आहेत. काही ठिकाणी बिबटय़ांकडून माणसांवरती, गुराढोरांवरती होणाऱया आकस्मिक हल्ल्यांमुळे त्रस्त झालेली माणसे अशा बिबटय़ांचे समूळ उच्चाटन करण्याच्या मार्गी लागल्याने त्यांना पळता भुई थोडी झालेली आहे. आंध्र प्रदेशमध्ये घाबरलेला असा बिबटा विजेच्या खांबावरती चढल्याने, विजेच्या धक्क्याने मृत पावल्याची दुर्घटना उघडकीस आलेली आहे.

तामिळनाडूतल्या वलपराईच्या चहाच्या मळय़ात तर महाराष्ट्रातल्या पुणे-जुन्नरच्या ऊसाच्या मळय़ातला मानव आणि बिबटा यांच्यातला संघर्ष खूपच टोकाला पोहोचल्या कारणाने तो सध्या चर्चेचा विषय झालेला आहे. मानवाच्या जीवावरती बिबटा उठलेला आहे अशी धारणा झाल्याने, त्यांच्या शिकारीचा आनंदोत्सव साजरा करणाऱया मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बिबटय़ांच्या पंजांची नखे, त्यांचे दात, कातडी यांच्यासाठी शिकार करणाऱयांच्या टोळय़ा आपल्या परिसरात वावरत असताना, अशा निर्घृण हत्यांसाठी त्यांना शिक्षा होण्याऐवजी, त्यांना समाजामार्फत आश्रय देऊन, त्यांच्या गुन्हय़ांवरती पांघरूण घालण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. प्राणीशास्त्रज्ञ डॉ. विद्या अत्रेय यांनी मानव आणि बिबटय़ांच्या विकोपाला गेलेल्या संघर्षाची कारणमीमांसा करत, या समस्येचे निराकरण करण्यासाठी काय करणे शक्य आहे याबाबत ऊहापोह केलेला आहे. परंतु कानात  बोटे आणि डोळय़ांवरती झापडे लावून वावरणाऱया आपल्या नेत्यांच्या आणि संबंधित अधिकाऱयांच्या वाढत्या नाकर्तेपणामुळे मानव-बिबटा यांच्यातला संघर्ष वाढला असून, त्यांना उपद्रवी घोषित करून ठार मारण्यात धन्यता मानली जाते. मानव-बिबटा यांच्यातल्या संघर्षाचा गैरफायदा उठवत शिकाऱयांच्या टोळय़ा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बिबटय़ांची नखे, हाडे, दात, कातडीसारख्या अवयवांना असलेल्या मागणीमुळे त्यांची निर्घृणपणे शिकार करत आहेत. त्यामुळे या अवयवांची तस्करी केल्यावरती 55 बिबटय़ांचे अवशेष आढळलेले आहेत.

भारतीय वन्यजीव व संरक्षण समाजाने जानेवारी ते जून 2018 या सहा महिन्यांच्या कालखंडात मृत झालेल्या बिबटय़ांबाबत विशेष अभ्यास केला असता शिकाऱयांनी 90 बिबटय़ांची हत्या केल्याचे उघडकीस आलेले आहे. 77 बिबटय़ांना नैसर्गिक मृत्यू, 34 रस्त्यावरच्या प्राणघातक अपघातात मृत्यूमुखी पडल्याचे तर 22 बिबटय़ांचा मृत्यू गावकऱयांशी उद्भवलेल्या संघर्षातून झाल्याचे प्रकाशात आलेले आहे. 13 बिबटय़ांचा मृत्यू त्यांच्याच प्रजातीशी झालेल्या भांडणात, 9 बिबटय़ांचा मृत्यू त्यांच्या सुटकेच्यावेळी, 4 बिबटे रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेले आहेत. 3 बिबटय़ांचा मृत्यू विजेचा धक्का तर तिघांना उपद्रवी ठरवून वनखात्याने ठार केलेले आहे. बिबटय़ांच्या मृत्यूचे लक्षणीय प्रमाण उत्तराखंडात असून, इतक्या अल्प काळात चक्क 24 बिबटय़ांना मृत्यू आल्याचे स्पष्ट झालेले आहे. सहा महिन्यात महाराष्ट्रात 17, मध्य प्रदेशात 10, हिमाचल प्रदेशात 9 आणि छत्तीसगडसारख्या राज्यात 9 बिबटय़ांना आलेले मरण ही चिंताजनक बाब आहे. गोव्यातल्या महावीर अभयारण्यातून लोंढा-मुरगावचा दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मार्गावरती प्रौढत्वाच्या वाटेवर असणाऱया एका मादी बिबटय़ाचा मृत्यू झालेला आहे. पहाटेच्यावेळी रेल्वेमार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना या मादीचा धावत्या रेल्वेची जबरदस्त धडक बसून करुणरित्या मृत्यू झालेला आहे. गोव्यासारख्या पश्चिम घाटातल्या राज्यातला मानव-बिबटा संघर्ष इतका टोकाला गेलेला आहे की रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एखाद्या बिबटय़ाचे दर्शनही स्थानिकांना तापदायक ठरू लागलेले आहे. त्यामुळे अशा बिबटय़ाचे उपद्रवमूल्य जाणून न घेता त्याला बंदिस्त करण्यासाठी वनखात्यावरती पिंजरा लावण्यासाठी सातत्याने दबावतंत्राचे अवलंबन केले जात असल्याचे स्पष्ट होऊ लागलेले आहे.

जंगलातल्या तृणहारी श्वापदांची संख्या त्यांना आवश्यक चारापाणी नसल्याने आणि मांसासाठी त्यांची शिकार होत असल्याने झपाटय़ाने कमी होऊ लागलेली आहे. रानात भूक शमविण्यासाठी तृणहारी प्राणी मिळणे दुरापास्त झाल्याने बिबटय़ांनी आपला मोर्चा गावोगावी, शहरोशहरी उकिरडय़ांवरती धुमाकूळ माजवणाऱया कुत्र्यांकडे वळविलेला आहे. सहजपणे अशा भटक्या कुत्र्यांची शिकार करून, आपणाला आवश्यक मांस, रक्त मिळत असल्याने, त्यांची चटक लागलेल्या बऱयाच बिबटय़ांनी रिकाम्या गोदामात किंवा उसाच्या मळय़ात लोकवस्तीच्या आसपास वास्तव्य करण्याची जोखीम पत्करलेली आहे. त्यामुळे कुत्र्यांना पळवण्यासाठी रात्रीच्या वेळेला आलेल्या बिबटय़ाशी त्या परिसरातल्या माणसाशी गाठ पडली तर आकाश कोसळल्यागत वाटते आणि तेव्हापासून बिबटय़ाला जेरबंद करण्याच्या मागणीला जोर चढतो. गेल्या दशकभरात 1,593 बिबटय़ांचा झालेला मृत्यू ही खरेतर चिंतेची बाब ठरलेली आहे. आम्हा माणसांना जसा पृथ्वीवरती जगण्याचा अधिकार आहे तसाच बिबटय़ासारख्या जंगली श्वापदांनाही आहे ही बाब आम्ही विसरत चाललो आहोत आणि त्यामुळे मानव-बिबटय़ातल्या संघर्षाची धार बोथट व्हावी यासाठी नियोजनबद्ध विशेष प्रयत्न झाले नाहीत तर त्याची जबर किंमत आम्हाला मोजावी लागेल!