|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चंद्रग्रहणाची धास्ती… वास्तूप्रमाणे

चंद्रग्रहणाची धास्ती… वास्तूप्रमाणे 

अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी उत्तर कर्नाटकावर अन्याय केल्याचा आरोप करून होणारी स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी 2 ऑगस्ट रोजी उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, हुबळी-धारवाड, बागलकोटसह तेरा जिल्हय़ात बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, रक्तचंद्र ग्रहणाची धास्ती आणि रेवण्णा यांची वास्तू यांच्या चर्चेत वरील सर्व मुद्दे आपसूकच बाजूला सारले गेले आहेत.

 

शुक्रवारी या शतकातील प्रदीर्घ खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. गेल्या महिनाभरापासून कर्नाटकात या ग्रहणाची चर्चा सुरू आहे. खासगी वाहिन्यांवर तर गेला आठवडाभर अनेक ज्योतिषी, शास्त्रपारंगत पंडित आदींना पाचारण करून ग्रहणामुळे पृथ्वीला कसा धोका संभवतो, संकटे टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना व तोडगे करावेत, कर्नाटकाच्या राजकारणावर, समाजकारणावर या ग्रहणाचे कोणते परिणाम जाणवणार आहेत, यासंबंधी चर्चेचे गुऱहाळ सुरू आहे. ग्रहण ही एक नभोमंडलात घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते पाहिल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. जेथे जेथे दिसेल तेथे ग्रहण पाहण्याची संधी सोडू नका, असे आवाहन विज्ञाननि÷ांनी केले आहे. मात्र, ग्रहणाविषयी विज्ञाननि÷ांच्या आवाहनापेक्षाही ग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी धार्मिक विधी करा म्हणणाऱयांची संख्याच अधिक आहे आणि त्यांनाच प्रसारमाध्यमातून भरभरून प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे ग्रहणाविषयीची धास्ती वाढली आहे.

शुक्रवारचे ग्रहण खग्रास आहे. या ग्रहणात चंद्र हा रक्तवर्णीय दिसणार आहे. त्यामुळे हे रक्तचंद्रग्रहण आहे. निसर्गावर त्याचे परिणाम होणार आहेत. अपघात, घातपात, अतिवृष्टी, पूर आदींबरोबरच राजकीय उलथापालथीही होणार आहेत, असे भाकित ज्योतिषांनी केले आहे. त्यामुळे साहजिकच राजकीय नेत्यांच्या मनातील भीती वाढली आहे. अनेक नेत्यांनी ग्रहणाच्या दोष निवारण्यासाठी होमहवनही सुरू केले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना हे ग्रहण अशुभ फल देणारे आहे, असे एका ज्योतिषाने सांगितल्यानंतर या भाकिताची दखल घेत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी उडुपीजवळील आनेगुंदी मठात शतचंडिका होम व महारुद्र याग केला आहे. अत्यंत गुप्तपणे रविवारी आणि सोमवारी या यागाचे विधी झाले. या धार्मिक विधीत शंभर पुरोहितांनी भाग घेतल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी स्वतः यजमान येडियुराप्पा व त्यांचे कुटुंबीय धार्मिक विधीत सहभागी झाले होते.

कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक सम्मत झाले आहे. होमहवन व फलज्योतिषाला या विधेयकाच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. सध्या काँग्रेस-निजद युतीची सत्ता आहे. युती सरकारचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व त्यांचे वडील माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची नावे तर होमहवन, पूजाअर्चा आदींसाठी आघाडीवर असतात. लोकशाहीच्या मूळ संकल्पनेला धक्का देणारी कृती या नेत्यांकडून वारंवार घडते. भविष्यवाणीसाठी कर्नाटकात प्रसिद्ध असणाऱया कोडी मठाच्या स्वामीजींनीही चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच काव्यात्मक भविष्यकथन केले आहे. ‘राजा संकटात येणार, भावाच्या हाती सत्ता सूत्रे जाणार’ असे भाकित त्यांनी केले आहे. या भाकिताभोवती आता राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कुमारस्वामी यांचे मोठे भाऊ व युती सरकारमधील मंत्री एच. डी. रेवण्णा हे तर कधीपासूनच मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. राहू काल संपल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाहीत.

एकीकडे विज्ञाननि÷ा सांगणाऱया राजकीय नेत्यांचे अंतर्मन कर्मकांडाकडे कसे वळते, याचे ताजे उदाहरण कर्नाटकात पहायला मिळते. कुमारस्वामी सरकारने कसेबसे दोन महिने पूर्ण केले आहेत. एच. डी. रेवण्णा यांनी मोक्मयाचा सरकारी बंगला आपल्या पदरात पाडून घेतला आहे. केवळ वर्षभरापूर्वी माजी मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांनी तीन कोटी रुपये खर्चून ज्या बंगल्याचे रंगरूप बदलले होते, आता रेवण्णा यांनी त्याच बंगल्याची वास्तूप्रमाणे फेरफार करण्याची कामे हाती घेतली आहेत. यासाठी त्यांनी आजवर मोठी रक्कम खर्च केली आहे. शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी एकेक रुपया गोळा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची दमछाक झाली. त्यामुळे अवास्तव खर्चावर त्यांनी आळा घातला असतानाच त्यांचेच थोरले बंधू रेवण्णा यांनी वास्तूप्रमाणे बंगल्याचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारी पैशाची उधळपट्टी सुरू केली आहे.

कोणत्याही नेत्याने स्वखर्चाने स्वतःचे घर कसे असावे, त्याची वास्तू कशी असावी याचा विचार करून फेरफार केला तर त्याला कोणीच हरकत घेणार नाही. सरकारी बंगल्याची वास्तूप्रमाणे रचना करण्यासाठी जनतेच्या पैशाचा चुराडा करण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. रक्तचंद्र ग्रहणाइतकीच रेवण्णांच्या वास्तू प्रकाराचीही चर्चा झडते आहे. याविषयी प्रश्न विचारणाऱया पत्रकारांना हे सगळे विचारणारे तुम्ही कोण, असा प्रतिप्रश्न विचारून रेवण्णा यांनी कुमारस्वामी मुख्यमंत्री असले तरी सुपर सीएम मीच आहे, हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आमदारकीची शपथ घेतानाही रेवण्णा यांनी ज्योतिषावर आपला किती विश्वास आहे हे दाखवून दिले होते. राहू काल संपल्यावरच आपण शपथ घेणार, असे सभाध्यक्षांना सांगून त्यांनी साऱयांनाच चकित केले होते. आताही विधानसभेत रेवण्णांची एंट्री झाली तर राहू काल संपला, असे सगळेच चेष्टेने म्हणत असतात.

उडुपी येथील शिरुर मठाचे मठाधीश श्रीलक्ष्मीवरतीर्थ स्वामीजींचा गूढ मृत्यू, कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही 5 ते 23 जुलै या काळात तीस शेतकऱयांनी केलेली आत्महत्या, बसपाससाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेले राज्यव्यापी आंदोलन, आधी विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याची घोषणा करून आता केवळ सरकारी शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांनाच बसपास देऊ, असे सांगत घुमजाव करणारे मुख्यमंत्री, म्हादई नदीचे कालव्याद्वारे मलप्रभा नदीत गुपचूपपणे सोडलेले पाणी, अन्नभाग्य योजनेंतर्गत सात किलो तांदूळ वाटप करायचे की पाच किलो याचा सुरू असलेला तिढा आदी मुद्देही गेला आठवडाभर ठळक चर्चेत आहेत. अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी उत्तर कर्नाटकावर अन्याय केल्याचा आरोप करून होणारी स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी 2 ऑगस्ट रोजी उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, हुबळी-धारवाड, बागलकोटसह तेरा जिल्हय़ात बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, रक्तचंद्र ग्रहणाची धास्ती आणि रेवण्णा यांचा वास्तू यांच्या चर्चेत वरील सर्व मुद्दे आपसूकच बाजूला सारले गेले आहेत.