|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » परमार्थ तनाने की मनाने?

परमार्थ तनाने की मनाने? 

भगवान श्रीकृष्णांना त्या गोपी म्हणाल्या-आम्ही सर्वच विषयांचा शारीरिक आणि मानसिक त्याग करून आपल्या चरणांपाशी आलेल्या आहोत. आपल्यासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग केला आहे. सांसारिक विषयांचा विवेकपूर्वक त्याग करून केवळ आपल्या भेटीच्या इच्छेने आम्ही आलेल्या आहोत. आमची उपेक्षा करू नका. आमच्या मनात आपल्याशिवाय आणखी काहीच शेष नाही.

शारीरिक त्याग तर जीव त्वरित करू शकतो, पण मानसिक त्याग करणे फार कठीण आहे. मानसिक त्याग न करता केवळ शारीरिक त्याग करणे दांभिकता ठरेल. मानसिक त्यागच मुख्य आहे. शरीर कुठेही असेना, परंतु मनातून ईश्वराला दूर होऊ देऊ नका. वृत्त आणि अवृत्त नावाच्या दोन साधुंची कथा मोठी उद्बोधक आहे. ते दोघे यात्रा करीत होते. प्रयागराजच्या दिशेने चालले होते. जन्माष्टमीच्या दिवशी वेणीमाधवाचे दर्शन करू इच्छित होते. चालता चालता रात्र झाली. थकूनही गेले होते. एक वेश्यागृह पाहिले तर अवृत्त म्हणाला-जोराचा पाऊस पडत आहे, अंधारही आहे, रस्ता दिसत नाही आणि मी थकलो आहे. तर मी आज इथेच राहीन. तुला पुढे जायचे असेल तर जा. वृत्ताला वाटले कीं कदाचित याचे मनात कामाने प्रवेश केला आहे. मी इथे राहू शकत नाही, असा विचार करून तो पुढे गेला आणि प्रयागराजच्या मंदिरात जाऊन थांबला.

अवृत्त वेश्यागृहात थांबला होता, पण आता त्याला पश्चात्ताप होऊ लागला. तो आपल्या स्वतःलाच टोचू लागला. धिक्कार असो माझा. मी किती क्षुद्र, हीन भाग्याचा आहे की जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या मंदिरात थांबायच्या ऐवजी इथे पडून राहिलो आहे! माझा मित्र वृत्त किती भाग्यवान आहे कीं यावेळी तो प्रभूच्या मुखारविंदाचे दर्शन करीत असेल. मंदिरात उत्सव होत असेल, वैष्णव लोक प्रभूचे दर्शन करीत असतील. तेथे भजन, कीर्तन, आरती, वंदन होत असेल. किती भव्य आणि पवित्र असेल ते दृश्य. याप्रमाणे अवृत्त वेश्यागृही होता परंतु त्याचे मन वेणीमाधवाजवळ होते. मोठय़ा तन्मयतेने तो मनातल्या मनात जन्माष्टमीचा प्रसंग पहात होता.

तिकडे मंदिरात बसलेला वृत्त देखील पश्चात्ताप करीत होता. तो विचार करू लागला कीं इतके मोठे कष्ट करून मी इथे व्यर्थ आलो. तिथे माझा मित्र सुंदर वेश्यांबरोबर क्रीडा करीत असेल आणि मी इथे ह्या गर्दीत घुसमटला जात आहे. किती भाग्यवान आहे माझा मित्र! त्याचे मन उत्सवात लागतच नव्हते. त्याला त्या वेश्येच्या सौंदर्याचेच दृश्य दिसत होते. त्याचे शरीर तर माधवाच्या मंदिरात होते, परंतु मन वेश्येपाशी.

अवृत्ताला मोक्ष मिळाला आणि वृत्ताला नरक. अवृत्ताला घ्यायला देवाने विमान पाठविले. कारण तनाने भलेही तो वेश्यागृही असो, पण मनाने तर वेणीमाधवापाशी होता. वृत्त तनाने होता मंदिरात, परंतु त्याचे मन वेश्यागृहात पोहोचले होते. तो  वासनासुखाचें चिंतन करीत होता. म्हणून त्याला नरकात जावे लागले.