|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कॉपीचा रंग लवकर उडून जातो !

कॉपीचा रंग लवकर उडून जातो ! 

कॉपीचा रंग लवकर उडून जातो !

कौशिकी चक्रवर्ती यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास रियाज एक दोनदा नाही तर 999 वेळा करायचा असतो.

आजच्या बाजारू व्यवस्थेने कलेचा बाजार केला तर झटपट प्रसिद्धीच्या मोहापायी कलाकाराने बाजारू व्यवस्थेला शरण जात आपली कलाच बाजारभावाने विकून टाकली. यात बघता बघता हुबेहूब दुसऱयाची कला सादर करण्याला प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली. या प्रतिष्ठेला दीर्घ आयुष्य नसते हे ज्यांना माहिती नाही त्यांची कला तर अल्प काळातच लोप पावली, आणि कॉपीचा रंग लवकर उडून जात असतो याची जाणीव नसलेल्यांचे कलारंगच फिके पडले. म्हणूनच आजची बाजारू व्यवस्था आपल्या दारापर्यंत आली असताना नव्या गायकांनीच नाही तर कोणत्याही कलेतील नव्या कलाकारांनी आपल्या कलेचा गांभिर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. गाण्याचा रियाज म्हणजे कार्यक्रमात सातत्याने गाणे सादरीकरण करणे नव्हे तर रियाज म्हणजे एकांतात गात गात, गाण्याशी एकरूप होत, गाण्याचा स्वर आपलासा करताना त्यात आपापल्या जगण्याचा अर्थ शोधणे होय हे ध्यानात घ्यायला हवे.

 आजच्या या अशा सगळय़ा पार्श्वभूमीवर तरुण अभ्यासू शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी अलीकडेच गायनाबाबत काही ठोस वक्तव्य केली. कौशिकी यांनी मांडलेले विचार अगदी प्रगल्भ आणि जीवनच संगीतमय करू पाहणाऱया नव्या गायकांना भान देणारे आहेत. गायनात एखादा राग रंगमंचावर उलगडून दाखवताना ते गाणे केवळ त्या रागाचे राहत नाही. ते जीवन उलगडल्या सारखेच होऊन जाते. तुमच्या व्यक्तिमत्त्चाचे प्रतिबिंब तुमच्या प्रत्येक कलाकृतीत दिसते. म्हणूनच ती कलाकृती मानवनिर्मित असणे आणि व्यक्तिगणिक त्यात बदल घडत जाणे हे अभिप्रेतच आहे, तसे झाले नाही तर आपण सगळे एका   फॉर्म्युल्याचे होऊ! कौशकी यांनी हे अशा प्रकारे नेमक्या शब्दात प्रत्येक गायकाचे आपापल्या गायनाशी आपापले स्वतंत्र नाते कसे असावे हे सांगितले. मात्र याचे भानच हरवून बसलेल्यांना याच्याशी काही देणेघेणे नसते. म्हणूनच ते स्वतःच्या गाण्याशी स्वतःचे नाते तोडून दुसऱयाचीच तान गात बसतात आयुष्यभर. त्या तानेचा ‘ताण’ आपल्यावर कधीपासून आला आहे आणि त्यात आपले कला भविष्य अंधारमय झाले आहे याची अस्पष्ट जाणीवही त्यांना झालेली नसते. मात्र ही जाणीव ज्यांना ज्यांना लवकरात लवकर होते तो स्वतंत्र प्रतिभेचा गायक ठरतोच, परंतु त्याची त्याची स्वतंत्र गायनशैली निर्माण होते. म्हणजेच त्याचे त्याचे गायनाचे भावार्थ वेगळे वेगळे उमटत राहतात. हीच गोष्ट चांगल्या गायक कलावंताकडून अपेक्षित असते आणि असे एकदा झाले की गाणे आणि जगणे स्वतंत्र असे उरत नाही, अवघा रंग एक होतो!

काळाबरोबर कलेच्या सादरीकरणात बदल होत जातो. पण कलेचे मूळ स्वरूप बदलत नाही. पण माध्यमांच्या झपाटय़ामुळे मानसिकता अशी झाली आहे की आपल्यात गुणात्मक वाढ झाली नाही तरी चालेल पण आपला चेहरा रोजच्या रोज रसिकांसमोर येत राहायला पाहिजे. यामुळे जाहीर गुण मिळविण्याची स्पर्धां महत्त्वाची वाटू लागली आणि त्यातून दुसऱया बाजूला गायनाच्या अंगभूत कलेचा गुणात्मक  विकास करण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. यातून मोठा धोका असा निर्माण झाला की मग खेडय़ापाडय़ातून मागाहून येणाऱया उदयोन्मुख गायक पिढीलाही वाटू लागले. समोर टी.व्ही.च्या पडद्यावर स्पर्धेत जे चमकते ना तीच सर्वश्रेष्ठ कला आहे आणि तिथे पोहचणे हेच आपले अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. तशी त्यांची मानसिकता बनविण्याची यंत्रणा आज राबवली जाते. ती गायन कलेला बाजारात रूपांतर करणारी असून तिला फक्त तुमच्यात असलेल्या टॅलेंटचे मार्केटींग करायचे असते. ते असे मार्केटींग असते की टी.व्ही.च्या पडद्याचा प्रेक्षक ग्राहक म्हणून दारात उभा असतो. त्याला फक्त निवडायचीच संधी द्यायची असते. तो जे निवडेल ते  टॅलेंटच असेल असे नाही. पण आपण ज्याची निवड केली तोच विजेता-विजेती ठरली याचे त्याला मात्र समाधान मिळते. त्यामुळेच ज्या टी.व्ही.पडद्यावर ज्या गायक कलावंतांची विजेता म्हणून निवड झाली त्याच्यापेक्षा त्या टी.व्ही.पडद्याचीच जास्त चर्चा केली जाते आणि हेच आजच्या कला व्यवस्थापनाचे गणित असते.

खरंतर गायन नाही तर कोणतीही कला स्पर्धा वाईट म्हणण्याचे कारण नाही. उलट अशा मोठय़ा स्पर्धांमुळे शहर आणि खेडे यातील अंतर मिटून खेडय़ातीलही एखादा गुणवान गायक कलावंत अगदी अल्प दिवसातच जगासमोर येऊ लागतो आहे आणि यातून मग लोकांसमोर यायचे त्याचे संघर्षाचे अंतर कमी होऊ लागले आहे. किंबहुना ग्रामीण भागातूनही चांगले टॅलेंट असल्याचे अशा टी.व्ही.चॅनेलच्या स्पर्धांमुळे लक्षात यायला लागले. पण वाईट एवढे की या स्पर्धेच्या पलीकडे संगीताचे जग आहे हे यातील अपवादात्मक व्यक्तींना कळायला लागले. त्यामुळे अनेकांचे संगीताचे करीअर सुरू होण्याआधीच संपले. स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा नसेल तर नेमके काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला अशा घटनेकडे पाहता येते. गायन कलेची स्वतःची ओळख ही गाण्याचे कार्यक्रम सादर करून होते हा समज चुकीचा आहे. कार्यक्रमात तुम्ही गात असलेले गाणे तुमचेच नसेल, तुमचा गाण्याचा आवाज ऐकताना दुसऱया कुणाच्या आवाजाचे स्मरण होत असेल तर तुम्ही तुमची ओळखच निर्माण करण्याच्या वाटेवरही नाही असे समजायला हरकत नाही! अशाचवेळी तुमच्या गायन साधनेचा कस लागत असतो. यासाठी मंचीय कार्यक्रमाच्या मोहापासून दूर राहावे लागते. एकदा त्याची चटक लागली की त्यापासून दूर राहणे सोडूनच द्या पण सतत माध्यमांमध्येही आपले नाव प्रसिद्ध व्हायला हवे अशीही मानसिकता तुमची बनत जात असते. यासाठी आपली आवाजाची स्वतंत्र ओळख निर्माण होईल अशी वाटचाल प्रारंभापासूनच करायला हवी.

इतरांच्या आवाजाचा प्रभाव प्रारंभीच्या कालावधीत असणे समजून घेता येते. पण त्यातून बाहेर पडण्याची तुमच्या मनाची तयारी हवी. तुमची गायक म्हणून ओळख निर्माण व्हायला लागली की या सगळय़ा मोहमयी दुनियेपासून थोडे दूर राहतच तुमची गानसाधना चालू ठेवावी लागते. यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात इतर व्यासंगाचीही जोड द्यावी लागते आणि मुख्यतः तुम्ही गायन कलेचे इतरांचे गुरु होण्यापासून स्वतःला रोखत तुम्ही तुमचेच गुरु होण्याची क्षमता तुम्हाला तुमच्या अंगी बाणवावी लागते. आपणच आपले गुरु होणे म्हणजे आपली स्पर्धा आपल्याशीच आहे याची जाणीव होणे होय! असे एकदा झाले की गाण्याचा रियाज म्हणजे काय हेही कळते आणि मग शेवटी कौशिकी चक्रवर्ती यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास रियाज एक दोनदा नाही तर 999 वेळा करायचा असतो याचीही जाणीव होते. अर्थात ज्यांना अल्पकालावधीत लोकप्रिय व्हायचे असते, गुरु व्हायचे असते आणि लोकल मेंटॅलीटीतून संगीताचे राजकारण करायचे असते त्यांच्या हे लक्षात येणे कठीणच!

अजय कांडर