|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत युवा संघाचा दणदणीत विजय

भारत युवा संघाचा दणदणीत विजय 

दुसऱया युवा कसोटीत लंका युवा संघावर एक डाव 147 धावांनी मात

भारताच्या 19 वर्षाखालील युवा संघाने यजमान लंकेच्या 19 वर्षाखालील संघाचा दुसऱया युवा कसोटीत तब्बल एक डाव व 147 धावांनी दणदणीत पराभव करून दोन कसोटींची मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली.

या सामन्यात भारताच्या युवा संघाने प्रथम फलंदाजी करीत 8 बाद 613 धावा जमवित पहिला डाव घोषित केला होता. त्यात पवन शहाचे विक्रमी द्विशतक (282), अथर्व तायडेचे शतक (177), नेहल वढेराचे अर्धशतक (64) आणि जुयलच्या उपयुक्त 41 धावांचा समावेश होता. त्यानंतर लंका युवा संघाचा पहिला डाव 316 धावांत आटोपला. त्यात सुरियाबंदाराचे शानदार शतक (115), दनुशाचे अर्धशतक (51), मेंडिस (49) व मिशारा (44) यांच्या उपयुक्त योगदानाचा समावेश होता. मोहित जांगराने 76 धावांत 4 बळी मिळविले तर यतिन मंगवानी, आयुष बदोनी, देसाई यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.

भारताला पहिल्या डावात 297 धावांची भक्कम आघाडी मिळाल्यानंतर लंकन युवा संघाला त्यांनी फॉलोऑन दिला. दुसऱया डावातही लंकन युवा संघाची घसरगुंडी उडाली आणि सिद्धार्थ देसाई, यतिन मंगवानी, आयुष बदोनी यांच्या भेदक माऱयासमोर त्यांचा डाव 150 धावांत आटोपल्याने भारत युवा संघाला एक डाव 147 धावांनी विजय मिळाला. या स्तरावर पदार्पण करणाऱया देसाईने 20 षटकांत 40 धावांत 4 बळी टिपले. त्याने पहिल्या डावातही दोन बळी मिळविले होते.

तिसऱया दिवशीअखेर लंकन युवा संघाने 18 षटकांत 3 बाद 47 धावा जमविल्या होता. डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना आणखी 250 धावा जमविण्याची किंवा सामना अनिर्णीत राखण्यासाठी पूर्ण दिवस खेळून काढण्याची गरज होती. पण देसाई व त्याच्या सहकाऱयांनी आपल्या भेदक माऱयावर त्यांना हे उद्दिष्ट गाठू दिले नाही. ठरावीक अंतराने गडी बाद होत गेले आणि त्यांचा दुसरा डाव 150 धावांत आटोपला. पहिल्या डावात त्यांनी बऱयापैकी कामगिरी केली ती सुरियाबंदाराच्या शतकाच्या जोरावर. पण दुसऱया डावात सुरियाबंदाराला केवळ 10 धावा जमविता आल्या. याशिवाय केएनएम फर्नांडोने 25, एमएनके फर्नांडोने सर्वाधिक 28 आणि एसटी मेंडिसने 51 चेंडूत 26 धावा केल्या. तसेच वियसकांतने 16, दिनुशाने 11 धावा काढल्या. भारतातर्फे मोहित जांगरा, अर्जुन तेंडुलकर यांनीही एकेक बळी मिळविले.

देसाईप्रमाणेच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुननेही या सामन्यांतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच्याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. त्याने आपल्या डावखुऱया वेगवान गेलंदाजीवर तिसऱया दिवश कामिल मिशाराचा बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक : 19 वर्षाखालील भारत युवा संघ प.डाव 8 बाद 613 डाव घोषित 8 : पवन शहा 282, अथर्व तायडे 177, नेहल वधेरा 64, जुयल 41, एल.मलिंगा 1-92, वियसकांत 1-94.

19 वर्षाखालील लंका युवा संघ प.डाव 114.3 षटकांत सर्व बाद 316 : सुरियाबंदारा 115 (236 चेंडूत 17 चौकार), दनुशा 51 (144 चेंडूत 8 चौकार), एसटी मेंडिस 49 (109 चेंडूत 8 चौकार), कामिल मिशारा 44 (94 चेंडूत 7 चौकार, जांगरा 4-76, मंगवानी 2-30, बदोनी 2-39, देसाई 2-84). लंका युवा संघ दु.डाव 62.2 षटकांत सर्व बाद 150 : एमएनके फर्नांडो 28 (106 चेंडूत 2 चौकार), एसटी मेंडिस 26 (51 चेंडूत 4 चौकार), केएनएम फर्नांडो 25 (55 चेंडूत 5 चौकार), सुरियाबंदारा 10, दनुषा 11, वियसकांत 16  (32 चेंडूत 3 चौकार), अवांतर 13, देसाई 4-40, मंगवानी 2-9, बदोनी 2-17, जांगरा 1-33, अर्जुन तेंडुलकर 1-39.