|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पत्नीच्या छेडछाडीवरून युवकाचा खून

पत्नीच्या छेडछाडीवरून युवकाचा खून 

गुहागर-वेळणेश्वर खारवीवाडीतील घटनेने खळबळ

मृत युवक तीन वर्षांपासून आरोपीच्या पत्नीची काढत होता छेड

डोक्यात दांडक्याचा वर्मी फटका बसल्याने जागीच मृत्यू

प्रतिनिधी /गुहागर

आपल्या पत्नीची वारंवार छेड काढत असल्याने संतापलेल्या पतीने वेळणेश्वर-खारवीवाडी येथील घराशेजारील भावकीतीलच 40 वर्षीय युवकाचा डोक्यात दांडक्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. एवढेच नव्हे तर मृताच्या पत्नीलाही मारहाण करत जबर जखमी केले. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

दिवाकर हरी तांडेल (40, वेळणेश्वर खारवीवाडी) असे ठार झालेल्या व्यक्तीचे, तर नंदकुमार बाबाजी तांडेल (50, वेळणेश्वर खारवीवाडी) असे आरोपीचे नाव आहे. या बाबत येथील पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीवरून, मृत दिवाकर हरी तांडेल हा गेल्या तीन वर्षापासून नंदकुमार तांडेल याच्या पत्नीची छेड काढत होता. यावर भावकीमध्ये बैठका घेऊन हा विषय मिटवण्यात आला होता. मात्र शनिवारी सकाळी पुन्हा नंदकुमार तांडेलच्या पत्नीची दिवाकर तांडेल याने छेड काढली. त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान नंदकुमार तांडेल हा घरी आला असता या छेडछाडीची घटना त्यास समजली. यामुळे संतप्त झालेल्या नंदकुमारने दिवाकरच्या घरी जाऊन त्याच्याच घरातील दांडका घेऊन पहिला फटका त्यांच्या पायावर मारला. त्यानंतर दुसरा फटका त्याच्या डोक्यात घातला. यात डोक्याला वर्मी फटका बसल्याने दिवाकर जागीच कोसळला. आपल्या नवऱयाला होत असलेली मारहाण पाहून घरामध्ये असलेली दिवाकरची पत्नी देवयानी मारहाण थांबवण्यासाठी पुढे आली, परंतु संतप्त नंदकुमार याने देवयानीच्याही हातावर व डोक्यामध्ये दांडक्याचे वार केले. यामुळे तीही खाली कोसळली.

दरम्यान, दिवाकर खाली कोसळलेला पाहताच घरातील त्याच्या दोन लहान मुलांनी आरडाओरडा सुरू केला. मात्र आरोपी नंदकुमार तांडेल हा घराच्या अंगणामध्ये उभा होता. अशावेळी संपूर्ण वाडीतील ग्रामस्थ गोळा होताच आरोपी थेट आपल्या घरी जाऊन बसला. वाडीतील महिलांनी जखमी देवयानीला खासगी वाहनाने येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये पाठवून दिले, तर वेळणेश्वरचे पोलीस पाटील चैतन्य धोपावकर यांनी येथील पोलीस स्थानकात या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे यांनी साथीदारांसह घटनास्थळी पोहोचले व आरोपी नंदकुमार तांडेल याला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली. तसेच मारहाणीत जखमी झालेली मृताची पत्नी देवयानी हिच्यावर येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार करून तिला येथील पोलीस स्थानकात जाबजबासाठी आणण्यात आले. या प्रकरणी येथील पोलिसांनी आरोपी नंदकुमार तांडेल याच्यावर भादंवि कलम 307, 302, 452प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करत आहेत.

कामावर जाण्याच्या आधीच घडले अघटीत

मृत दिवाकर तांडेल हा बहुतेकवेळी वेडसरपणाने वाडीतील महिलांशी बोलत असे. मात्र तो वेडा आहे, असे म्हणून अनेकजण दुर्लक्ष करत असत, पण नंदकुमार तांडेल याने आपल्या पत्नीची छेड काढल्याने रागाच्या भरात दिवाकरला मारहाण केली आणि डोक्यात बसलेला दांडक्याचा मार वर्मी लागून तो मृत झाला.

मृत दिवाकर व आरोपी नंदकुमार या दोघांमध्ये नेहमीचे भांडण नव्हते, परंतु शनिवारी छेडछाडीवरून ही घटना घडली. पावसाळय़ात मच्छिमारी बंदी काळात ही सर्व मंडळी आपल्या घरी येतात. यामुळे आता पुन्हा बोटींवर जाण्याची त्यांची तयारी सुरू झाली होती. मृत दिवाकर हा हर्णे येथे खलाशी म्हणून काम करत होता, तर आरोपी नंदकुमार हा कुलाब्याला खलाशी म्हणून काम करतो. नंदकुमार शनिवारी रात्री कुलाब्याला जाण्यासाठी निघणार होता. मात्र सकाळीच ही घटना घडली.