मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, चाकणमध्ये 25 ते 30 बसेस पेटवल्या

ऑनलाईन टीम / पुणे :
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी चाकणमध्ये काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आक्रमक मोर्चेकऱयांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरतानाच मिळेल त्या बसेसवर दगडफेक करत बसेसची जाळपोळ केल्याने पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला. त्यामुळे चाकणमध्ये प्रचंड तणाव पसरला असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज सकाळी चाकणमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 11 वाजता आंदोलकांनी रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. आंदोलन शांततेत सुरू असताना त्याचवेळी एका आंदोलकाने बसवर दगड मारला. त्यानंतर इतर आंदोलकांनीही दगडफेक करत बसेसना टार्गेट केलं. या आंदोलकांनी 25 ते 30 वाहनांची तोडफोड करत या बसेसना आगी लावून दिल्या. त्यामुळे लोकांमध्ये एकच धावपळ उडाली. आक्रमक झालेल्या या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीमारही केला. पण चवताळलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या.