|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » केंद्र शासनामार्फत सिंधुदुर्गात ‘जिल्हा युवा संसद’चे आयोजन

केंद्र शासनामार्फत सिंधुदुर्गात ‘जिल्हा युवा संसद’चे आयोजन 

जिल्हय़ातील सर्व महाविद्यालये होणार सहभागी

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

भारत सरकारच्या ‘संकल्प से सिद्धी’ या चळवळी अंतर्गत महाराष्ट्राबरोबरच सिंधुदुर्गातही ‘जिल्हा युवा संसद’ (युथ पार्लमेंट) प्रतिनिधी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ओरोस येथील सुभाष फाटक कला, वाणिज्य व
विज्ञान महाविद्यालयाला या आयोजनाचे यजमानपद मिळाले आहे. 6 ऑगस्टला ओरोस येथील आंबेडकर भवनात निवड कार्यक्रम होणार आहे. ओरोस महाविद्यालयाचे प्राध्यापक बांबुळकर यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या ‘जिल्हा युवा संसद’ मध्ये मुंबई विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेल्या सिंधुदुर्गातील प्रत्येक  महाविद्यालयातून तीन विद्यार्थी व तीन विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. या युवा संसदेत सहभागी होणारे विद्यार्थी स्वच्छता, दारिद्रय़, भ्रष्टाचार, आतंकवाद, जातीयता, पर्यावरण सुरक्षा अशा एकूण 14 विषयांना अनुसरून आपले विचार मांडणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांमधून अवघे चार सर्वोत्कृष्ट विद्यार्थी निवडण्यात येणार असून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे.

याप्रसंगी ज्युरी म्हणून पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, निवृत्त लष्करी अधिकारी काम पाहणार आहेत. मुंबई विद्यापीठामार्फत राज्यभरातून एकूण 55 स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत. विजेत्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.