|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » संयमावर भर दिल्यास यश निश्चित : रहाणे

संयमावर भर दिल्यास यश निश्चित : रहाणे 

वृत्तसंस्था/ बर्मिंगहम

चंचल स्वरुपाच्या इंग्लिश हवामानात 20 बळी घेण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संयमाने मारा करावा लागेल आणि याचवेळी भारतीय फलंदाजांसमोर देखील अशाच प्रकारचे आव्हान असेल, असे प्रतिपादन भारतीय उपकर्णधार अजिंक्य रहाणेने केले. ‘इंग्लंडमध्ये गोलंदाजांना नेहमी मदत होते. पण, गोलंदाजांसाठी ते सोपे होते, असा याचा अर्थ अजिबात होत नाही. गोलंदाजांनी दोन्ही बाजूंनी नियंत्रित, शिस्तबद्ध मारा केल्यास यश खेचून आणता येईल. सामन्यात आपण 20 बळी सहज घेऊ शकतो, हे सिद्ध करण्याची नामी संधी आपल्या गोलंदाजांकडे येथे असेल’, असेही तो म्हणाला. रहाणेने यापूर्वी 2014 च्या इंग्लंड दौऱयात लॉर्ड्सवर सामना जिंकून देणारी शतकी खेळी तर साकारलीच. शिवाय, दौऱयातील 5 कसोटीत आणखी 2 अर्धशतकांसह 299 धावांचे योगदानही दिले होते.

मोहम्मद शमी व उमेश यादव 2014 मध्येही इंग्लंड दौऱयात होते. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही उत्तम कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेत आम्ही कसोटी मालिकेत सर्वच्या सर्व 60 बळी घेण्यात यशस्वी ठरलो होतो, याची रहाणेने येथे आठवण करुन दिली. ‘फलंदाजी करत असताना सेट झाल्यानंतर मोठी खेळी साकारण्यासाठी प्रयत्न करायचे आणि हवामान अचानक बदलले तर स्वतःवर संयम राखायचा, हीच इंग्लंडमधील खरी गुरुकिल्ली ठरेल’, असे तो पुढे म्हणाला.