|Monday, February 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » भुईंज गाव राज्यात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्नशील ठरेल

भुईंज गाव राज्यात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्नशील ठरेल 

वार्ताहर/ भुईंज

भुईंज ग्रामपंचायतीने महिला सबलिकरणासाठी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. घराघरातील महिलांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहचवून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची ग्रामपंचायतीने स्विकारलेली जबाबदारी ही विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारी आहे. यातूनच भुईंज गाव राज्यात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्नशील ठरेल, असे प्रतिपादन केनियाचे राजदूत राजेश स्वामी केले.  

भुईंज ग्रामपंचायतीच्यावतीने 14 व्या वित्त आयोगांतर्गत महिला सबलिकरण कार्यक्रम महिलांना कापडी पिशव्या तयार करण्यासाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना गावचे सुपूत्र व केनियाचे भारत सरकारचे प्रतिनिधी राजेश स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सरपंच पुष्पा भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव, माजी सरपंच अनुराधा भोसले, अर्जुन भोसले उपस्थित होते. 

राजेश स्वामी पुढे म्हणाले, भुईंज गावच्या मातीशी व माणसांशी माझे वेगळे नाते गुंफलेले आहे. इथं मला आणि माझ्या कुटुंबियांना मिळालेले संस्कार, प्रोत्साहन यातूनच माझा प्रवास यशस्वी झाला आहे. त्यामुळे मी ज्या-ज्यावेळी गावात येतो त्यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतो, वेळोवेळी माझ्या माध्यमातून शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने महिलांच्या सशक्तीकरणाचा कार्यक्रम हाती घेताना प्लास्टिक निर्मूलन, पर्यावरणाचा समतोल या गोष्टी बारकाईने पाहिलेल्या आहेत. कापडी पिशव्या शिवण्यासाठी व त्यातून फॅशनेबल बॅग्ज या शिकवण्यासाठी प्रशिक्षिका विद्या किर्वे यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहे. यापुढेही माझ्या गावची ग्रामपंचायत विकासाच्या कामाबरोबरच राज्यात अग्रेसर होण्यासाठी सर्वांनी एकजीवाने प्रयत्न करूया, असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 

कार्यक्रमात स्वागत माजी सरपंच अर्जुन भोसले यांनी तर प्रास्ताविक उपसरपंच प्रशांत जाधवराव यांनी केले. कार्यक्रमास दिडशे प्रशिक्षाणार्थी महिला, महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सुनंदा मोहिते, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सदस्या, ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: