|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » मराठा मोर्चाकडून कायगाव टोकाच्या पुलाला काकासाहेब शिंदेचे नाव

मराठा मोर्चाकडून कायगाव टोकाच्या पुलाला काकासाहेब शिंदेचे नाव 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेणाऱया गंगापूर येथील काकासाहेब शिंदे या युवकाच्या दहाव्याचा कार्यक्रम बुधवारी कायगाव टोका येथे झाला. शिंदे याने ज्या ठिकाणी जलसमाधी घेतली त्या कायगावच्या पूलाला त्याचे नाव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले, तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला.

काकासाहेब शिंदे याने 23 जुलै रोजी कायगावातील गोदापात्रात जलसमाधी घेतली होती. त्यावेळी या ठिकाणी संतप्त जमावाने मोठय़ प्रमाणावर तोडफोड केल्याने दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. नगर- औरंगाबादकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानेही कायगाव टोका भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तसेच नगर- औरंगाबाद दरम्यान धावणाऱया गाड्याही शेवगावमार्गे वळविण्यात आल्या होत्या. सुदैवाने दिवसभर या भागात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. कायगाव हे औरंगाबाद व नगर जिह्याच्या हद्दीवर आहे. बुधवारी औरंगाबादच्या हद्दीत 800 पोलिस अधिकारी व 300 कर्मचारी तैनात होते. तर नेवासा हद्दीत 120 पोलिस व 5 अधिकारी तैनात केले होते. शिंदे यांच्या दशक्रिया विधीसाठी राज्यभरातील मराठा मोर्चाचे समन्वयक व कार्यकर्ते मोठय़ संख्येने कायगावात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींना मात्र सुरक्षेच्या कारणास्तव येणे टाळले. यापूर्वी शिंदेंच्या अंत्यविधीसाठी आलेले शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, बुधवारी शिवप्रहारचे संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर व गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, संतोष माने, संजय जाधव आदींनी शिंदेंना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच मराठा तरुणांनी आत्मघाताचा विचार मनात आणू नये, असे आवाहनही केले. कायगाव टोका येथे सोमवारी व मंगळवारी झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी 76 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी 31 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा मोर्चाकडून केली जात आहे.