|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांची उपासमार

शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांची उपासमार 

वार्ताहर /बुगटेआलूर :

बीसीएम विभागाचे शासकीय वसतीगृह बुगटेआलूर मराठी शाळेच्या आवारामध्ये कार्यरत आहे. या ठिकाणी 49 विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे. पण  आठवडय़ापासून या मुलांच्या वसतीगृहामधील धान्य, तेल, भाजीपाला संपल्याने विद्यार्थ्यांची उपासमार होत होती. जि. पं. सदस्य महेश कुंभार यांनी अचानक भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ग्रामस्थ व पालकवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बुगटेआलूर परिसराच्या ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण व राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने कर्नाटक सरकारने गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ही सोय केली आहे. यामध्ये 2018-19 सालासाठी 49 विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. या विद्यार्थ्यांना सकाळी नाष्टा-चहा, दुपारी जेवण, सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पुन्हा नाष्टा-चहा व रात्री जेवणाची सोय केली आहे. पण या विद्यार्थ्यांना योग्य आहार मिळत नसून वसतीगृहाचे निरीक्षक नागराज करनिंग यांनी धान्यसाठा व भाजीपाला वेळेवर मिळाला नसल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज होती. पण त्यांनी दुर्लक्ष केल्याने या गरीब विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या वसतीगृहातील आचाऱयांनी स्वखर्चाने गरजेपुरते तेल, बटाटे, डाळ आणून विद्यार्थ्यांना खाऊ घातले आहे. सदर प्रकार जि. पं. सदस्य महेश कुंभार, ता. पं. सदस्या, अनिता पाटील, एपीएमसी सदस्य विजय शेरेकर, कणगला ग्रा. पं. अध्यक्ष अशोक हिरेकुडी, माजी ग्रा. पं. अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सदर प्रकाराची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.