|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरीत मराठा समाजाच्या ठिय्यास प्रारंभ

पंढरीत मराठा समाजाच्या ठिय्यास प्रारंभ 

पंढरपूर / प्रतिनिधी :

येथील पंढरपूर शहर आणि तालुक्याच्या वतीने आज सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यामध्ये  आंदोलन 9 ऑगस्टपर्यत होणार आहे. आंदोलनाचा प्रारंभ येथील शिवाजी चौकातून तहसिल कार्यालयापर्यत मशाल रॅली काढून करण्यात आला.

साधारणपणे सकाळी अकराच्या सुमारास येथील शिवाजी चौक येथे पंढरपूर शहरासह भाळवणी जिल्हा परिषद गटातील मराठा बांधव पंढरपूरात आले होते. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी येथील शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाचे पूजन केले. त्यानंतर येथून मशाल घेउन सर्व मराठा बांधवांचा ताफ्ढा तहसिल कार्यालयाकडे चालत गेला आणि याठिकाणी मराठा आंदोलनाच्या पुढील सात दिवस चालणाऱया ठिय्याचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी भाळवणी जिल्हा परिषद गटांमधून आलेल्या महिलांच्या हस्ते आंदालनस्थळी ठेवलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. याप्रसंगी मराठा आंदोलनासाठी आत्मबलिदान दिलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आणि सदरच्या ठिय्या आंदोलनाची सुरूवात झाली.

यावेळी कुठल्याही प्रकारचा डामडौल न करता सदरच्या आंदोलनास सुरूवात करण्यात आली. यामधे कुठल्याही पुढा-यांचे अथवा समाजाबांधवाचे भाषण यावेळी झाले नाही. दिवसभरातही कुठल्याही प्रकारची भाषणाची रेलचेल याठिकाणी झाली नाही. केवळ मराठा समाजाचा आरक्षाचा एल्गार आंदोलनस्थळी दिसून आला. या आंदोलनाच्या निमित्ताने मोठया प्रमाणावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. यावेळी केवळ मराठा आरक्षण, शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी, जय शिवराय इतक्यांच घोषणांचा आवाज निनादत होता.