|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उत्तमाचा ध्यास घेऊन दोन्ही लघुपट पूर्ण केले

उत्तमाचा ध्यास घेऊन दोन्ही लघुपट पूर्ण केले 

प्रतिनिधी /मडगाव :

मडगावातील गोमन्त विद्या निकेतनच्या ‘सिनेमॅजिक फिल्म सोसायटी’ या उपक्रमाच्या अंतर्गत संस्थेच्या ऍम्फीथिएटरमध्ये राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गोमंतकीय दिग्दर्शक आदित्य जांभळे यांचे ‘आबा ऐकताय ना ?’ आणि ‘खरवस’ हे दोन लघुपट नुकतेच दाखविण्यात आले. त्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. तसेच संस्थेच्या ‘आस्वाद’ या मासिक उपक्रमाच्या अंतर्गत जांभळे यांची मुलाखत कला विभागाच्या सदस्या स्वरूपा शिकनीस यांनी घेतली. उत्तमाचा ध्यास घेऊन हे लघुपट पूर्ण केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आदित्य हे या क्षेत्राकडे कसे वळले इथपासून ते दोन्ही लघुपटांच्या निर्मिती प्रकियेच्या प्रवासापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी मनमोकळय़ा गप्पा मारल्या. शाळेत असताना पु. ल. देशपांडे लिखीत ‘वाऱयावरची वरात’ पाहून ते प्रभावित झाले व त्यातल्या एका छोटय़ाशा प्रसंगाच्या त्यांनी केलेल्या अनुकरणाला प्रेक्षकांनी दिलेली दाद त्यांना जाणवली. पुढे विज्ञान शाखेत शिकत असताना अवधुत कामत लिखीत ‘विखुरलेली स्वप्ने’ या एकांकिकेत जांभळे यांनी पहिल्यांदा भूमिका केली. त्यानंतर विजयकुमार नाईक यांच्या ‘हंस ट्रेनिंग सेंटर’मध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अभिनयासाठी शरीराला कसे प्रशिक्षित करायचे हे नाईक यांनी शिकविले, असे जांभळे म्हणाले.

पुढे गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना ‘अरे माणसा माणसा’ ही एकांकिका जांभळे यांनी लिहिली व बसविली. सदर एकांकिकेने पुण्यातल्या स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केले. त्यानिमित्ताने पुण्या-मुंबईतल्या एकांकिका स्पर्धा, त्यातल्या विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व उत्साह, सहभाग व उर्जा पाहून आपल्याकडे असे का नाही याची खंत वाटली, असे त्यांनी स्पष्ट केले.