|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आजरा नगरपंचायतीचा कार्यभार गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अधिकाऱयांकडे

आजरा नगरपंचायतीचा कार्यभार गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अधिकाऱयांकडे 

तात्काळ हजर होण्याचा जिल्हाधिकाऱयांचा आदेश

प्रतिनिधी/ आजरा

नव्याने स्थापन झालेल्या आजरा नगरपंचायतीसाठी अधिकारी, कर्मचाऱयांचा आकृतीबंध मंजूर नाही. यामुळे नगरपंचायत प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी गडहिंग्लज नगरपरिषदेकडील चार अधिकाऱयांकडे आजरा नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. तर आजरा येथे तात्काळ हजर होऊन मुख्याधिकाऱयांमार्फत हजर रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले आहे.

आजरा नगरपंचायतीची निवडणूक एप्रिल महिन्यात झाल्यानंतरही दोन महिने तहसीलदार अनिता देशमुख यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. गेल्या महिन्यात गडहिंग्लज नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांच्याकडे आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारा म्हणून कार्यभार सोपविण्यात आला होता. मुख्याधिकाऱयांपाठोपाठ आणखी चार अधिकाऱयांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून मुख्याधिकाऱयांसह गडहिंग्लज नगरपरिषदेकडील पाच अधिकाऱयांकडे आता आजरा नगरपंचायतीचा कार्यभार राहणार आहे.

आजरा नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱयांचा आकृतीबंध अद्याप मंजूर नाही. पण नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजात अडचणी येऊ नयेत यासाठी अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पुन्हा पुढील आदेश होईपर्यंत या अधिकाऱयांकडे हा कार्यभार ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

गडहिंग्लज नगरपरिषदेकडील कनिष्ठ पाणीपुरवठा मलनिस्स:रण व स्वच्छता पर्यवेक्षक अनिल गंदमवाड यांची आजरा नगरपंचायतीचा पाणी पुरवठा अभियंता म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे. सहाय्यक लेखापाल शशिकांत मोहिते यांच्याकडे आजरा न. पं. चे सहाय्यक लेखापालपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. गडहिंग्लज न. प. चे सहाय्यक मिळकत व्यवस्थापक विजय शहाणे यांच्याकडे आजरा नगरपंचायतीचे सहाय्यक करनिरिक्षक म्हणून तर गडहिंग्लज न. प. चे कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक सुधीरकुमार पोतदार यांच्याकडे आजरा न. पं. चे बांधकाम अभियंता म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे. प्रभारी अधिकाऱयांच्या रूपाने का असेना पण आजरा नगरपंचायतीला मुख्याधिकाऱयांसह पाच प्रभारी अधिकारी प्राप्त झाले असून नगरपंचायतीच्या कामकाजाला गती मिळण्यास मदत होणार आहे.