|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मराठा आरक्षणासाठी प्रसंगी आमदारकीचा राजीनामा

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी आमदारकीचा राजीनामा 

आमदार संध्यादेवी कुपेकर यांची बैठकीत घोषणा

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची धग सुरूच आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यात अनेक आंदोलन झाली असून जोपर्यत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहिल, वेळप्रसंगी आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी असल्याची घोषणा आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली.

   मराठा आरक्षणप्रश्नी शुक्रवारी नगरपालिकेच्या शाहू सभागृहात मराठा समजाच्या बैठकी त्या बोलत होत्या. येत्या सोमवारपासून गडहिंग्लजला प्रांतकार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी गडहिंग्लजसह परिसरातील सकल मराठा समाजाचे कार्येकर्ते उपस्थित होते. आमदार कुपेकर बोलताना पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी पक्षाने यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. विधीमंडळातही मराठा आरक्षणावरून अनेक निवेदने दिली पण शासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असून मराठा समाजाचा उदेक झाला आहे. पक्षाच्या वतीने याप्रश्नी वेळोवेळी आपली भुमिका मांडली असून आरक्षण मिळेपर्यंत आता लढा सुरू रहाणार असून मराठा समाजाबरोबर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 सुरूवातीला नागेश चौगुले माहिती देताना म्हणाले, राज्यात आरक्षणासंबंधी अनेक मुक मोर्चे निघाले पण शासनाने याची दखल घेतली नाही. पण आता मराठा समाजाच्या भावनेचा उद्रेक झाल्याने समाज रस्त्यावर आला आहे. त्याला अनेक समाज, संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. गडहिंग्लजला सोमवारपासून ठिय्या आंदोलन होणार असून 6 व 7 ऑगस्ट रोजी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली. 

   गडहिंग्लज मराठा समाजाचे अध्यक्ष किरण कदम म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सोमवारपासून ठिय्या, साखळी आंदोलन, लोकप्रतिनिधीच्या घरावर मोर्चा काढणार असून शहराबरोबर तालुक्यातील प्रत्येक खेडय़ातील मराठा समाजाला यामध्ये सामावून घेणार असून आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती दिली. बैठकीत विद्याधर गुरबे, रामराज कुपकेर, दिलीपराव माने, राम शिवणे, नेताजी पाटील, प्रकाश तेलवेकर, सोमगोंडा आरबोळे, प्रा. शिवाजीराव भुकेले, राजेंद्र मांडेकर, शिवाजी खोत, शैलेंद्र कावणेकर, सतिश हळदकर, विश्वास खोत, अलका भोईटे, आप्पा शिवणे आदीनी आंदोलनाबाबत सुचना केल्या. या बैठकीत गडहिंग्लज तालुका आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनने मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचे पत्र दिले. शैलेंद्र कावणेकर, रमेश गायकवाड, कृष्णांत घोरपडे यांनी हे पत्र दिले.

  बैठकीस गणपतराव डोंगरे, रामगोंडा उर्फ गुंडय़ा पाटील, अमर मांगले, महेश सलवादे, रमेश तिकोडे, मंजूषा कदम, रश्मीराज देसाई, क्रांतीदेवी शिवणे, लता पालकर, सागर पाटील, तुषार यमगेकर, सुयोग मोरे यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते.