|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापालिकेत कमळ, ऐतिहासिक सत्तांतर

महापालिकेत कमळ, ऐतिहासिक सत्तांतर 

काँग्रेस-राष्ट्रवादीचा भ्रमनिरास : ‘मिरज पॅटर्न’ खालसा : तीन माजी महापौर पराभूत

प्रतिनिधी / सांगली

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेवर भारतीय जनता पक्षाने स्वबळावर सत्ता मिळवत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला पराभूत केले. महापालिका स्थापनेनंतर झालेल्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत मनपात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. स्वबळावर सत्तेवर आलेल्या भाजपाला 41, काँग्रेस आघाडी 35 (काँग्रेस 20 आणि राष्ट्रवादी 15), स्वाभिमानी आणि अपक्ष प्रत्येकी एक जागेवर विजयी झाले. लोकसभा, विधानसभा, जि.प. पाठोपाठ मनपावरही भाजपाचा झेंडा फडकल्याने काँग्रेस आघाडी बॅकफूटवर गेली आहे. भाजपाच्या यशाचे शिल्पकार म्हणून आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांना पक्षाकडून ‘शाबासकी’ मिळेल अशी चर्चा आहे.

मराठा आरक्षण, धनगर आरक्षण असे चिघळलेले प्रश्न यासह आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना घातलेली सांगली बंदी, जोडीला सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची पहिलीच निवडणूक यामुळे मनपाच्या निवडणुकीत काटय़ाची टक्कर झाली होती. आघाडीचे नेते 50 पेक्षा जादा जागा घेणार म्हणून छातीठोकपणे सांगत होते. मतमोजणीचे प्राथमिक कलही असेच होते. पण, नंतर चित्र पालटले आणि भाजपाने काठावर बहुमत मिळवले. या निकालानंतर समर्थकांनी गुलाल उधळत आतषबाजी केली. नेत्यांनी गणरायाचे दर्शनही घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. तर गाडगीळ, खाडे यांचे या ऐतिहासिक विजयाबद्दल विशेष कौतुक केले आहे. काँग्रेस आघाडीने जनतेचा कौल मान्य केला असून स्व. मदन पाटील, स्व. डॉ. पतंगराव कदम यांची निवडणुकीत कमतरता भासल्याचे म्हटले आहे. दरम्यान, महापौर निवड 13 ऑगस्टला होणार असून हे पद महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपासाठी या पदासाठी सविता मदने, अनारकली कुरणे, संगीता खोत, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर, अस्मिता सलगर, लक्ष्मी सरगर, गीता सुतार, नसीमा नाईक या उमेदवार चर्चेत आहेत. महापौरपदाची माळ कुणाच्या गळय़ात पडणार तसेच स्वीकृत आणि कारभारी कोण होणार? याकडे लक्ष लागले असून अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या निकालामध्ये काँग्रेसचे महापौर हारूण शिकलगार, विरोधीपक्ष नेते शेडजी मोहिते, माजी महापौर सौ. कांचन कांबळे, उपमहापौर विजय घाडगे, विष्णू माने, गजानन मगदूम, संजय मेंढे आदी दिग्गजांचा विजय झाला. तर विद्यमान स्थायी सभापती बसवेश्वर सातपुते, माजी महापौर इद्रिस नायकवडी, सभागृह नेते किशोर जामदार, माजी महापौर विवेक कांबळे, माजी स्थायी सभापती धनपाल खोत,  दिलीप पाटील, युवराज गायकवाड, राजू गवळी आदींना पराभवाचा धक्का बसला. प्रभाग 13 मध्ये माजी आमदार दिनकर पाटील यांनी मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढत सांगलीवाडीत पुन्हा आपली ताकद दाखवून दिली.                         

महापालिकेच्या 78 जागांसाठी 62.17 टक्के मतदान झाले होते. याची शुक्रवारी सकाळी दहापासून मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे मतमोजणी झाली. प्रभाग 12, 9, 15, 1, 6, आणि तीन या सहा प्रभागांची सुरूवातीला मतमोजणी करण्यात आली. तीन फेऱयांमध्ये या प्रभागाचा निकाल हाती आला. प्रभाग बारा मध्ये भाजपाने चारही जिंकल्या. येथे माजी स्थायी सभापती दिलीप सूर्यवंशी यांनी आपला गड कायम राखला. प्रभाग नऊमध्ये अपक्ष अतुल माने, बंडू सरगर यांनी काँग्रेस आघाडीसमोर तगडे आव्हान निर्माण केले होते. मात्र चुरशीच्या लढाईत माजी स्थायी सभापती संतोष पाटील यांच्यासह विद्यमान नगरसेविका रोहिणी पाटील, मनगूआबा सरगर, मदिना बारूदवाले यांनी विजय खेचून आणला. प्रभाग पंधरामध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आघाडीच्या चारही जागा विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी भाजपाचे रणजितसिंह पाटील-सावर्डेकर, सोनल पाटील-सावर्डेकर यांच्यासह भाजपाच्या चारही उमेदवारांना नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे भाजपा खासदार संजयकाका पाटील या प्रभागात वीस दिवस तळ ठोकून  होते. या निकालाने त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. प्रभाग एक असलेल्या कुपवाडमध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते धनपाल खोत यांना पराभवाचा दणका बसला. उपमहापौर विजय घाडगे यांनी त्यांचा पराभव केला. येथील चार पैकी तीन जागा आघाडीला मिळाल्या. प्रभाग सहामध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी विजय मिळवला. येथे बागवान यांच्यासह अतहर नायकवडी, रजिया काझी, नर्गिस सय्यद हे विजयी झाले. तर प्रभाग तीनमधील सर्वच जागांवर भाजपाचे कमळ फुलले. अनिता वनखंडे यांच्यासह शांता जाधव, संदीप आवटी, शिवाजी दुर्वे हे भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले. यानंतर प्रभाग 13, 10, 17, 2, 7, आणि चार या प्रभागांची मतमोजणी हाती घेण्यात आली. प्रभाग तेरा म्हणजे सांगलीवाडी येथे भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धोबीपछाड करीत तीनही जागांवर विजय मिळवला. भाजपा नेते माजी नेते दिनकर पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गत निवडणुकीतील पराभवाचा पुरेपुर उट्टे काढत माजी आमदार पाटील यांनी सांगलीवाडीत वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बेबनाव दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरला.

प्रभाग दहामध्ये अपक्षांच्या पॅनेलमुळे काँग्रेस आघाडीसह भाजपाच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान होते. मात्र अपक्षांना डावलत मतदारांनी भाजपा व काँग्रेसच्या बाजूने कौल देत दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागा बहाल केल्या. अटीतटीच्या लढाईत भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक मुन्ना कुरणे यांना सलग दुसऱया वेळी पराभवाला सामोरे जावे लागले. तर राष्ट्रवादीचा दोन्ही जागांवर पराभव झाला.
प्रभाग 17 मध्ये काँग्रेस आघाडीला दणका बसला. आघाडीचे विद्यमान नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांचा विजय झाला. तीन जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग दोनमध्ये मतदारांनी क्रॉस व्होटिंग करीत भाजपा, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीला प्रत्येक एक जागा तर एका जागेवर विद्यमान नगरसेवक गजानन मगदूम या उमेदवाराला साथ दिली. मिरजेतील प्रभाग सातमध्ये भाजपाने आघाडीचा दारूण पराभव केला. काँग्रसेचे माजी महापौर आणि गटनेते किशोर जामदार यांना पराभव पत्करावा लागला. प्रभाग चारमध्ये भाजपाने अपक्ष उमेदवारांचा पराभव करीत चारही जागा जिंकल्या. येथे आघाडीने उमेदवार उभे केले नव्हते.