|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवबाग बंधाऱयासाठी मुंबईत बैठक

देवबाग बंधाऱयासाठी मुंबईत बैठक 

खासदार विनायक राऊत यांची माहिती : चिपीत ऑक्टोबरनंतर कायम विमानसेवा

कोट- चिपी विमानतळावर ऑक्टोबरनंतर कायमस्वरुपी विमानसेवा सुरू राहणार विनायक राऊत, खासदार

प्रतिनिधी / मालवण:

चिपी विमानतळाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे येत्या 12 सप्टेंबरला पहिले विमान येथे उतरेल. या विमानतळाचा फायदा हा लगतच्या देवबाग, तारकर्लीसह मालवणला होणार आहे. विमानसेवेमुळे जगभरातील पर्यटक येथे येतील. या विमानतळावर दिवसाला चार ते पाच विमाने कशी उतरतील, यादृष्टीने प्रयत्न केले जातील. ऑक्टोबरनंतर कायमस्वरुपी विमानसेवा सुरू राहील, असे खासदार विनायक राऊत यांनी देवबाग येथे बोलताना सांगितले. देवबाग बंधाऱयासाठी मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, समुद्री उधाणाच्या तडाख्यापासून देवबाग गाव आजच्या घडीला वाचविणे महत्त्वाचे आहे. यादृष्टीने ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी पतन विभागाच्या मुख्य अधिकाऱयांसमवेत मंगळवारी 21 रोजी मुंबईत बैठक घेण्यात येईल. या बैठकीस स्थानिक ग्रामस्थांनाही निमंत्रित केले जाईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

राऊत यांनी शनिवारी देवबाग येथील संगम तसेच भांजीवाडा येथे उधाणामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख बबन शिंदे, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, नागेंद्र परब, तहसीलदार समीर घारे, मधुरा चोपडेकर, सरपंच जान्हवी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, प्रसाद मोरजकर, नगरसेवक पंकज सादये, समीर लब्दे, मकरंद चोपडेकर, किरण वाळके, अनिल केळुसकर, गणेश कुडाळकर, नंदू गवंडी, तपस्वी मयेकर, रमेश कदेकर, मनोज खोबरेकर, राजन कुमठेकर, बंदर विभागाचे अधिकारी सुषमा कुमठेकर, अमोल ताम्हणकर, देवबाग बचाव संघर्ष समितीचे देवानंद चिंदरकर, तमास फर्नांडिस, ग्रामसेवक युवराज चव्हाण, पतन विभागाचे अधिकारी यांच्यासह देवबाग बचाव संघर्ष समितीचे प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

बंधाऱयासाठी पाठपुरावा करणार!

बंधाऱयाच्या कामासाठी सीआरझेडची परवानगी आवश्यक आहे. देवबाग गाव हे ब्ल्यू झोनमध्ये समाविष्ट असल्याने ते वगळण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी दिलीप घारे यांनी केली. ब्ल्यू झोनमधून हे गाव वगळल्यास सीआरझेडची परवानगी घेण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे हे गाव ब्ल्यू झोनमधून वगळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. गावात मोबाईल मनोऱयासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत आपली जागा उपलब्ध करुन द्यावी. पावसाळय़ानंतर येथे मोबाईल मनोरा उभारला जाईल. देवबाग, तारकर्ली ही पर्यटन गावे असल्याने ही गावे मुक्कामाची ठिकाणे होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

तारकर्ली खाडीतील गाळ उपशाची माहिती घेणार

तारकर्ली खाडीपात्रात गेली काही वर्षे संक्शन मशीनद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी गेली दोन वर्षे गाळ काढण्याचे काम बंद असल्याचे सांगितले. शिवाय संक्शन केलेला गाळ खाडीपात्रालगतच टाकला जात असल्याने तो पुन्हा खाडीपात्रात येतो. गेल्या चार वर्षांत खाडीपात्रातील किती गाळ उपसा करण्यात आला याची माहिती राऊत यांनी बंदर विभागाला विचारली असता हे काम सागरी अभियंत्यामार्फत सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या बंदरातील गाळासंदर्भात मुंबईतील सागरी अभियंत्यांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.