|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » धनगरमोळा, किटवडे परीसरातील शेकडो एकर क्षेत्रातील पिके कुजली

धनगरमोळा, किटवडे परीसरातील शेकडो एकर क्षेत्रातील पिके कुजली 

प्रतिनिधी/ आजरा

तालुक्याच्या पश्चिम भागातील किटवडे, धनगरमोळा, सुळेरान, घाटकरवाडी परीसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडतो. किटवडे या गावाला तर महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. यावर्षीही या परीसरात मुसळधार झाला असून या पावसामुळे शेकडो एकर क्षेत्रातील ऊस, नाचना, भुईमूग आदि पिके कुजून नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱयांनी केली होती. त्यानुसार शनिवारी कृषि विभागाच्या अधिकाऱयांनी या परीसराला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पहाणी केली.

सिंधुदूर्ग जिल्हय़ाच्या सीमेवर असलेला हा परीसर आहे. सहय़ाद्रीच्या रांगांच्या परीसरात वसलेल्या या परीसरात कोकणातून येणारा पाऊस अक्षरश: कोसळतो. प्रत्येक वर्षी याठिकाणी 7 ते 8 हजार मी. मी. पाऊस होतो. बोचरी थंडी आणि कोसळणारा पाऊस यामुळे घरातून बाहेर पडणेही मुश्किल असते. अशा परीस्थितीतही येथील शेतकरी शेती करीत असतो. भात हे मुख्य पिक घेतले जात असले तरी ऊस, भुईमूग, नाचनी आदि पिकेही या परीसरात मोठय़ा प्रमाणात घेतली जातात.

यावर्षीच्या हंगामात 31 जुलै अखेर किटवडे परीसरात 4 हजार 406 मी. मी. इतका पाऊस झाला आहे. दररोज 150 मी. मी. पेक्षा अधिक पाऊस या परीसरात झाल्याने पिकांची हानी झाली आहे. प्रचंड पावसामुळे ऊसाची पाने फाटून गेली असून पाणी साचून राहील्याने ऊस पिक कुजून गेले आहे. तर भुईमूग व नाचनी पिकांची वाढच झालेली नाही. यामुळे या परीसरातील शेतकऱयांच्या यंदाच्या शेती उत्पन्नात मोठी घट होणार असून वर्षभराचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा असा प्रश्न येथील शेतकरी वर्गासमोर उभा राहीला आहे.

दररोज 150 मी. मी. किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस येथे होत असला तरी तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानात येथील आकडेवारी कमी येते. यामुळे दररोज अतिवृष्टी होऊन देखिल येथे अतिवृष्टी दिसत नाही. याचा फटका येथील शेतकरी वर्गाला बसत असून किटवडे परीसरासाठी खासबाब म्हणून प्रशासनाने निर्णय घेण्याची मागणीही येथील शेतकऱयांकडून होत आहे.

Related posts: